काँग्रेस पासूनच संविधानाला धोका..
मुंबई, दि. ११ एप्रिल :
काँग्रेसच्या राजवटीतच गेल्या साठ वर्षात देशाच्या संविधानामध्ये अनेक वेळा बदल केले गेले, छेडछाड केली गेली. उलटपक्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षाच्या कालखंडात कधीही संविधानात बदल झाला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने संविधानाला धोका हा काँग्रेस पासूनच आहे, अशा शब्दात मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला
मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये महायुतीचे मिळावे आयोजित करण्यात येत असून काल गोरेगाव, वर्सोवा, वडाळा या विधानसभेचे मेळावे पार पडले, तर आज विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आमदार अँड आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याला स्थानिक आमदार पराग अळवणी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजेच झूठपत्र आहे, ते न्याय पत्र नाही, अशी टीका करीत काँग्रेसने जाहीर केलेल्या घोषणांचा शेलार यांनी खरपूस समाचार घेतला. तसेच पार्ले विधानसभेतील मतदारांचे प्रश्न मग तो फनेल झोन मधील रहिवासी इमारती असो एअरपोर्ट अथॉरिटीच्या हद्दीतील झोपडपट्टी असोत, भाडेकरूचा असो या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार पराग अळवणी आणि विद्यमान खासदार पूनम ताई महाजन यांनी अथक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे पार्ले विधानसभेतून महायुतीच्या उमेदवाराला जे मताधिक्य मिळेल ते आघाडीच्या उमेदवाराला तोडताच येणार नाही, असा विश्वास व्यक्त करत आमदार आशिष शेलार यांनी या मेळाव्याला संबोधित केले.
