उत्तर मुंबईही मित्रांच्या घशात टाकायचा भाजपाचा डाव..
मुंबई, दि. ३१ मार्च;
पियुष गोयल यांनी अचानक मुंबई उत्तर ची जागा लढवण्याचा निर्णय घेतला, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांवर हुकूमशाही राजवट लागू कराल आणि त्यांना बळजबरीने खारफुटीच्या जमिनीवर नेऊन सोडाल, त्यांनाही शाश्वत विकास हवा आहे. भारताच्या विकासात त्यांचाही मोठा हात आहे. २०२२ पर्यंत प्रत्येक नागरीकाला स्वतःचे घर हे आश्वासन भाजपाचे अजूनही पूर्ण झालेलं नाही. कदाचित तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी लिहिलेली घटना ह्याचसाठी बदलायची आहे – ‘मित्रांचा विकास आणि गरीब हटाओ!’ हे धोरण राबवायच आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
मुंबई उत्तरचे लोकसभा उमेदवार, भाजपचे पीयूष गोयल यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ‘झोपडपट्ट्या शहरातून काढल्या गेल्या पाहिजेत आणि त्या सर्व मिठागरांच्या जमिनीवर हलवल्या जायला हव्यात’, या वक्तव्याचा आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला.
शाश्वत विकासासाठी आम्हीही कटिबद्ध आहोत पण बिल्डर्सना फायदा व्हावा ह्यासाठी भाजपचा मुंबईतील मिठागरांच्या जमिनींवर डोळा आहे . आम्ही आमच्या मिठागरांच्या जमिनींचं बिल्डर लॉबीपासून संरक्षण करू. सध्याच्या राजवटीचा हेतू ‘गरीबी हटाओ’ नसून ‘गरीब को हटाओ’ असा आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले .
भाजपच्या धोरणावर बोट ठेवताना आदित्य ठाकरे यांनी सरकारला सवाल केला आहे. मेट्रो कार डेपो 3,4,6 आणि 14 च्या कांजूरमार्ग जमिनीचा प्रस्ताव केंद्र सरकारने सॉल्टपॅन असल्याचा खोटा दावा करून का रोखला होता ? फक्त मुंबईकरांना फायदा होईल म्हणून ? कारशेड कांजूरमार्ग ला मागायचो तेव्हा हेच उमेदवार मंत्री असताना त्यांच्या खात्याने विरोध केला . सरकार पडल्यावर आरे येथे कारशेड आणला आणि मुंबईच्या विकासात खडा टाकण्याचा काम केलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
उत्तर मुंबई प्रमाणे धारावीही भाजपच्या मित्रांच्या घशात टाकायचा डाव आहे. झोपडपट्टीतील कामगार वर्ग इलेक्ट्रॉल बॉण्ड विकत घेऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. गरीबी हटाओ नाही, तर गरीब हटाव ही भाजपची मोहीम असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
झोपडपट्टी धारकांना मूळ जागेपासून मिठागरच्या ठिकाणी नेऊन त्यांना बेघर करण्याचा डाव हा भाजपचा असल्याचं उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीतून समोर आला आहे. मात्र वंचित, गरीब झोपडपट्टी धारकांना त्यांना बेघर करणाऱ्याला आमचा तीव्र विरोध आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
