अदानीच्या सर्वेक्षणाला सर्व धारावीकरांचा ठाम विरोध..
मुंबई, दि. १९ मार्च :
मोदानी अँड कंपनी यांच्या ‘धारावी विनाश’ मॉडेलला धारावीकरांकडून होणाऱ्या जोरदार विरोधामुळे हादरलेल्या मोदानी सरकारने आता फोडा आणि राज्य करा ही कुटनीती अवलंबली आहे. स्थानिकांचा विरोध झुगारून अदानींच्या डीआरपीपीएलने सुरु केलेले सर्वेक्षण हा या कपटी रणनीतीचा एक मुख्य भाग आहे परंतु अदानीच्या कंपनीकडून होत असलेल्या सर्वेक्षणाला प्रत्येक धारावीकराचा ठाम विरोध आहे, असे मुंबई विभागीय काँग्रेस अध्यक्ष व धारावीच्या आमदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी ठणकावून बजावले आहे.
यासंदर्भात बोलताना प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, लोकांच्या मनात भीती निर्माण करून धारावीकरांची एकजुट तोडायची ही या सर्वेक्षणामागील खेळी आहे पण या षडयंत्रामागील ‘असुरी शक्ती’ ने कितीही आटापिटा केला तरी धारावीकरांची एकजूट तुटणार नाही. धारावीकरांना उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे हाणून पाडू. जो भाग धारावी अधिसूचित क्षेत्रामध्ये अजून अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आला नाही, जिथल्या वसाहतींना रेल्वेने अगोदरच बेकायदेशीर ठरवून तेथील रहिवाशांच्या मनात भीती निर्माण केली आहे, अशा लोकांवर सर्व्हे करून घेण्याचा दबाव टाकला जात आहे. सत्ताधारी पक्षातील एक लोकप्रतिनिधी सातत्याने लोकांना भ्रमित करत आहे.
कुठलेही सर्वेक्षण करण्यापूर्वी धारावीतील अस्तित्वात असलेल्या सर्व बांधकामांना पात्र ठरवणारा ‘मास्टर प्लॅन’ तयार करून तो लोकांसमोर मांडावा व त्यावर लोकांची संमती घ्यावी. एकाही धारावीकराचे स्थलांतर होऊ देणार नाही, प्रत्येक धारावीकराचे पुनर्वसन हे धारावीतच झाले पाहिजे. २०२३ च्या नोटिफिकेशननुसार नव्याने जोडलेल्या रेल्वे जमिनीच्या भागांना अधिकृतपणे अद्याप कोणत्याही सेक्टरशी जोडलेले नाही. या भागाला नवीन सेक्टर क्रमांक देण्याचा अधिकृत निर्णयही जाहीर झाला नाही. तिथली झोपडपट्टी गणनाकृत केलेली नाही. ही कायदेशीर प्रक्रिया पहिल्यांदा पार पाडावी आणि नंतरच पुढची पावले उचलावीत अशा मागण्या वर्षाताई गायकवाड यांनी केल्या आहेत.
