शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची विशाल सभा.
मुंबई, दि. १८ मार्च :
शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची अतिविशाल सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, आज ज्यांच्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्यांनी महिला, शेतकरी, कामगार, आदिवासी, दलितांनी जे आश्वासन दिली होती ती पूर्ण केली नाहीत. आश्वासन देऊन जनतेला फसवले त्यांना हटवण्याची गरज आहे. मोदींची गॅरंटी खोटी आहे, ती चालणार नाही. मुंबईतूनच महात्मा गांधी यांनी छोडो भारतचा नारा दिला होता आज छोडो भाजपा हा नारा दिला पाहिजे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा हा एक फुगा आहे आणि त्या फुग्यात हवा भरण्याचे काम शिवसेने केले आहे. आता भाजपच्या डोक्यात हवा गेली आहे. आता लढाई आहे ती लोकशाही व संविधान वाचवण्याची. घटना बदलण्यासाठी भाजपाला ४०० पार जागा आहेत. देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तरच आपण वाचू. कोणी कितीही मोठा असू त्याच्यापेक्षा देश मोठा असतो. २०१४ पासून एकाच पक्षाचे सरकार आहे, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आला नाही. जनता एकवटली तर हुकूमशाहीचा अंत होतो. अब की बार भाजपा तडीपार अशी घोषणा घेऊन गावागावात जा, असे ठाकरे म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इलोक्टोरल बाँडबदद्ल अमित शाह स्पष्टीकरण देत आहेत पण फ्युचर गेमिंग सारख्या अनेक कंपन्या आहेत ज्यांनी नफ्यापेक्षा जास्त किमतीचे बाँड खरेदी केली, त्यांच्याकडे हा पैसा कुठुन आला, याची चौकशी केली पाहिजे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी आवाज उठवावा असे आवाहनही त्यांनी केले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी भाजपावर टीका करत सेव्ह इंडियाचा नारा दिला व भारत जोडो न्याय यात्रेने देश जोडण्याचे काम केल्याचे म्हणाले.
बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव म्हणाले की, कितीही दबाव टाकला तरी आम्ही कोणीही झुकणारे नाहीत, सर्वजण लढणारे आहेत. लालू प्रसाद यांच्यावर दबाव आणला पण ते झुकले नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यात भाजपाचे योगदान काय असा सवाल त्यांनी विचारला.
झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन म्हणाले की, देशातील हुकुमशाहीविरोधात सर्वजण एकत्र आलो आहेत, ही एकजूट कायम ठेवू व हुकूशाही वृत्तीच्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचू.
झारखंड मुक्ती मार्चाच्या नेत्या कल्पना हेमंत सोरेन म्हणाल्या की, आमदारांना खरेदी करुन महाराष्ट्रातील सरकार पाडले. विरोधकांवार दबाव टाकला जातो. भाजपा सरकारने हेमंत सोरेन यांनाही जेलमध्ये टाकले पण झारखंड झुकला नाही व इंडियाही झुकणार नही असा निर्धार केला.
शिवाजी पार्कवरील सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खासदार राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पिडिपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, प्रभारी रमेश चेन्नीथला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
सभेपूर्वी खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.
