काँग्रेसच्या ‘महिला न्याय गॅरंटी’मध्ये काय आहे ?
धुळे, दि. १३ मार्च :
भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष पाच गॅरंटी जाहीर करत आहेत, यातील तीन गॅरंटी जाहीर केलेल्या आहेत. धुळ्यातील महिला न्याय हक्क परिषदेच्या निमित्ताने नारी शक्तीसाठी पाच गॅरंटी जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला न्याय गॅरंटी अंतर्गत देशात महिलांसाठी एक अजेंडा तयार केला जात आहे. या अंतर्गत काँग्रेस पक्षाने ५ घोषणा केल्या असून यात ‘महालक्ष्मी गॅरंटी’, ‘अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क’, ‘शक्ती का सम्मान’, ‘अधिकार मैत्री’ व ‘सावित्रिबाई फुले महिला वसतिगृह’ या पाच महिला गॅरंटी काँग्रेस पक्ष देत असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी जाहीर केले.
भारत जोडो न्याय यात्रेच्या महिला हक्क न्याय परिषदेला ॲानलाईन संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महालक्ष्मी गॅरंटी अतंर्गत देशातील सर्व गरिब महिलांना दरवर्षी १ लाख रुपयांची मदत दिली जाईल. अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क, अंतर्गत केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ५० टक्के हिस्सा महिलांना दिला जाईल. शक्ती का सम्मान, अंतर्गत आंगणवाड़ी सेविका, आशा सेविका आणि मध्यान्न भोजन योजनेतील कर्मचाऱ्यांचे वेतनात केंद्र सरकारचा हिस्सा दुप्पट केला जाईल. अधिकार मैत्री, अंतर्गत महिलांना त्यांच्या न्याय हक्कांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी व मदतीसाठी प्रत्येक पंचायतीमध्ये कायदे सल्लागाराची नियुक्ती केली जाईल आणि सावित्रिबाई फुले वसतिगृह अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात महिला वसतिगृह बांधले जाईल. याआधी काँग्रेस पक्षाने शेतकरी न्याय, युवा न्याय व भागिदारी न्याय संदर्भातील गॅरंटी जाहीर केल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी पोकळ वा जुमले नसतात तर त्या काळ्या दगडावरील रेघ असतात. आमच्या विरोधकांचा जन्मही झाला नव्हता तेंव्हा १९२६ पासून जाहिरनामे बनवतो व त्यातील घोषणा पूर्णही करतो. काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आणि लोकशाही व संविधान वाचवण्याच्या या लढाईत आमचे हात बळकट करा, असे आवाहनही मल्लिकार्जून खरगे यांनी केले आहे.
