भाजपच्या खोटेपणावर कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार!: सचिन सावंतांचे भाजप नेत्यांना आव्हान

0
sachin sawant

स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यातील सवलतीचा भाजपचा दावा खोटा ठरला असतानाही भाजपचे नेते ते मान्य करायला तयार नाहीत.सर्वोच्च न्यायालयात सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांनीच त्यांचा हा खोटारडेपणा उघड करुनही त्यांची वृत्ती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच दिसते. आपला खोटेपणा उघड पडला की वैयक्तिक पातळीवर घसरण्याची भाजपाची खोड जुनीच असून भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस यावे मी त्यांचा खोटारडेपणा पुराव्यासह सिद्ध करुन दाखवण्यास तयार आहे, असे जाहीर आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे.

भाजप नेत्यांच्या खोटारडेपणाचा समाचार घेताना सावंत पुढे म्हणाले की, मोदीजींच्या तसेच आशिष शेलार यांच्या जन्माआधीपासून सर्व पॅसेंजर ट्रेन या सबसिडीवरच चालतात. केवळ स्लिपर क्लासचेच नाही तर फर्स्ट क्लासचे तिकिटही सबसिडाईज्ड असते. या बोटाची थुंकी त्या बोटावर करण्यात भाजपचे नेते पटाईत आहेत. मजुरांच्या रेल्वे भाड्याचा ८५ टक्के खर्च केंद्र करते असे गेले महिनाभर छाती बडवून भाजपा नेते सांगत होते. हा खोटेपणा पकडल्यावर आता ते ही ८५ टक्के सबसिडी आहे असे म्हणत आहेत. या देशातील सर्व पॅसेंजर वाहतूक ही सबसिडीवरच चालते. हा खर्च मालवाहतूक व कमर्शियल मार्केटिंग मधून भरून काढला जातो. रेल्वेने १ जानेवारी २०२० ला भाडेवाढ केली त्यावेळी असलेल्या स्लीपरच्या तिकिट भाड्यात आता श्रमिक स्पेशल करिता ५० रुपये वाढ केली आहे, हा असंवेदनशीलपणा नव्हे काय? जर कोविड अगोदर ५० रुपये स्वस्त तिकीट मिळत होते तर कोविडसाठी मोदी सरकारने काय दिले ? या प्रश्नाचे उत्तर भाजपाने द्यावे. याचबरोबर हॉलिडे स्पेशल असेल वा जनता श्रेणीच्या सर्व एक्सप्रेस या आताच्या श्रमीक रेल्वेपेक्षा स्वस्त दरात चालत होत्या. त्या रेल्वे त्याच श्रेणीतील आहेत. मग तेंव्हाही त्या ट्रेन सबसिडीत चालवल्या जात होत्या, मग आता कोरोनानंतर काय फरक पडला? काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने तर गरीबांसाठी गरीबरथ ही एसी ट्रेन सुरु केली. तीही सबसिडी वरच चालत होती. या संकटकाळाची तुलना कमर्शियल सर्विसबरोबर करणे ही असंवेदनशीलता आहे, असे सावंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *