ED ला घाबरून सिद्दीकी कुटुंबाची काँग्रेसशी गद्दारी.
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी:
मुंबई युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षावर केलेले आरोप अत्यंत हास्यास्पद व खोटे आहेत. २५ वर्षांपूर्वी सिद्दीकी कुटंबाला कोणीही ओळख नव्हते, बाबा सिद्दीकी यांना तीनवेळा आमदार, मंत्रीपद, झिशानला युवक काँग्रेसचे अध्यक्षपद व २५ व्या वर्षी आमदारकी दिली असतानाही समाजाचे नाव पुढे करुन अन्याय केल्याचा आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे. सिद्दीकी कुटुंबाला सर्व पदे देऊनही त्यांनी काँग्रेस पक्ष व समाजाशी गद्दारी केली आहे, असे प्रत्युत्तर मुंबई युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिले आहे.
मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात प्रसार माध्यमांशी बोलताना अखिलेश यादव यांनी झिशान सिददीकी यांचे सर्व आरोप खोडून काढले, ते म्हणाले की, मुंबई युवक काँग्रेसला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीप्रमाणे चालवण्याचा झिशान सिद्दीकीचा प्रयत्न होता, त्यात त्यांना यश आले नाही. ते कधीच संघटनेचे काम करत नव्हते. संघटन कार्यकर्त्यांच्या जीवावर चालते कोणाच्या मर्जीनुसार नाही. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो, त्यांना जे हवे होते ते मिळाले नाही म्हणून ते समाजावर अन्याय झाल्याचा खोटा आरोप करत आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचे नाव घेऊन त्यांनी समाजाशी गद्दारी केली आहे. ४६२ कोटी रुपयांच्या ईडीच्या केसमधून वाचण्यासाठी सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडली आहे.
युवक काँग्रेचे कार्याध्यक्ष सुफियान मोहसीन हैदर म्हणाले की, मुस्लीम समाजाला काँग्रेस पक्षाने नेहमीच प्रतिनिधित्व दिले आहे, नसीम खान, अस्लम शेख यांना आमदारकी, मंत्रीपदे पक्षाने दिली आहेत. झिशानचे वडील तीनवेळा आमदार राहिलेत, मंत्री, म्हाडाचे चेअरमन होते हे स्वतः आमदार झाले पण त्यांची भूक भागली नाही. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत येण्याच्यावेळी पक्ष सोडण्याचा त्यांचा डाव होता, आधीपासूनच त्यांचे षडयंत्र होते असे दिसत आहे.
युवक काँग्रेसचे महासचिव हरदुल सिंग यांनीही झिशान सिद्दीकींचे आरोप फेटाळून लावत त्यांना चोख उत्तर दिले आहे. झिशान सिद्दीकी यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. अल्पसंख्याक समाजाचा असल्याने काँग्रेसने अन्याय केल्याचा आरोप खोटा व हास्यास्पद आहे. युवक काँग्रेसमध्ये विविध पदावर अल्पसंख्याक समाजाचे पदाधिकारी आहेत, असेही हरदुल सिंग म्हणाले.
