मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही.
मुंबई, दि. २१ फेब्रुवारी-
मुंबईत आम्ही बिझनेस करायला आलो नाही, मुंबईला आम्ही सोन्याचे अंडे समजणारे नाही. ज्यांनी श्रमाने आपले घर उभे केले त्याची ही मुंबई आहे. काहींनी गेली 25 वर्ष मुंबईकरांना निवडणुकीपुरते वापरले. मात्र गेल्या 10 वर्षात आम्ही मुंबईकरांसाठी निर्णय घेतले. आम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही. त्याला याच ठिकाणी हक्काचे घर मिळण्यासाठी जे काय करावे लागेल ते आम्ही करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

काळाचौकी येथे आयोजित केलेल्या ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाला मला बोलावले तेव्हा मी म्हटले मी सत्कार घेत नाही. त्यांनी मला आग्रह केला ज्यांच्या करता आपण काम करतो त्यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आहे. २०१९ साली प्रविण दरेकर यांच्यासोबत बैठका घेतल्या. मुंबईतील माणूस आपले स्वतःचे घर का घेऊ शकत नाही. त्यावर शासन निर्णय केला. दुर्दैवाने २०१९ साली आपले सरकार गेले. ज्यांनी आपण मराठी माणसासाठी आहोत अशा वलग्ना केल्या. त्यांनी २०१९ चा शासन निर्णय
बिल्डरधार्जिन्या लोकांसाठी गुंडाळून ठेवला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपले सरकार आले. प्रविण दरेकर यांनी गृहनिर्माण सहकार परिषद घेतली. ती परिषद झाली त्यावेळी मला समारोपाला बोलावले. माझ्यासमोर १६ मागण्या ठेवण्यात आल्या. त्या १६ ही मागण्या आपण पूर्ण केल्या त्याचा शासन निर्णयही काढला. मात्र १६ मागण्यानी संपूर्ण गृहनिर्माणचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. काल प्रविण दरेकर यांनी माझी भेट घेऊन ३५ मागण्यांचे निवेदन दिले. या ३५ मागण्या आहेत त्यातील ८ मागण्या आजच मंजूर करण्यासारख्या आहेत. पण या ३५ मागण्यांवर १५ दिवसात बैठक घेऊन त्या कशा पूर्ण करता येतील त्यावर चर्चा करू. या कार्यक्रमासाठी ८ हजार संस्थांनी, २५ हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केले. जी निवेदने आली आहेत त्यावर आम्ही सर्वजण काम करू.
अभ्यूदय नगरचा पुनर्विकास महत्वाचा आहे. इथे येण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला परवानगी दिली तुम्ही माझ्यावतीने घोषणा करा. त्याप्रमाणे अभ्यूदय नगरच्या पुनर्विकासाचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ असेही फडणवीस म्हणाले. तसेच पोलीस वसाहतींचा प्रश्नही लवकरच सोडवू. आम्हाला एफएसआयची चिंता नव्हती. आम्हाला त्या भिंतीत राहणाऱ्या मराठी माणसाची चिंता होती. १०० फुटात राहणाऱ्या व्यक्तीला ५०० चौफु. घर देतोय. गिरणी कामगारांचा विषय सुनील राणे यांनी चांगला लावून धरला आहे. गोरेगाव पत्राचाळीतील लोकांचा प्रश्नही मार्गी लावलात. काही लोकांनी त्यांना गंडवले, मोर्च्यात नेले. पण त्यांचे काम केले नाही. आपण त्यांचा विषय मार्गी लावलात. हा माझ्या सत्काराचा कार्यक्रम नाही. हा सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काय करता येईल यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना आमदार दरेकर म्हणाले की, मुंबईतील हौसिंगमधील प्रश्नांची वचनपूर्ती करण्यासंदर्भात आणि ज्या समस्या आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी ‘धन्यवाद देवेंद्रजी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्यावर विश्वास व्यक्त करण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली आहे. गोरेगाव नेस्कोत परिषद घेतली. तिथे २२ मागण्या केल्या. त्या मागण्या मुंबईतून आल्या होत्या. २२ पैकी १६ शासन निर्णय मान्य करण्याचे काम देवेंद्र फडणवीस तुम्ही केलात. अनेक विषय आहेत. देवेंद्र फडणवीस तुमचे पाय येथे लागल्यामुळे इकडे काहींची हलचल वाढली आहे. गिरणगाव हा कुणाचा तरी बालेकिल्ला होता. येणाऱ्या काळात हा परिसर भाजपाचा बालेकिल्ला केल्याशिवाय राहणार नाही, असेही दरेकर म्हणाले. तसेच विकास काय असतो हे तुम्ही पाच वर्षाच्या काळात दाखवून दिलात. अडीच वर्षात विकास ढेपाळला होता. पुन्हा तुम्ही सरकार आणून विकासाला गती दिलात. येथे आलेले लाभार्थी आहेत. ही गर्दी तुमच्या प्रामाणिकपणाची, विश्वासाची आहे. तुम्हीच न्याय द्याल अशा लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यांना विश्वास द्या, अशी विनंती दरेकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केली.
