ठाकरे शिवसेनेतील अंतर्गत वैमनस्यातुन घोसाळकरांची हत्या..
मुंबई दि. ९ फेब्रुवारी :-
शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे.मात्र घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रकार जो विरोधक करत आहेत तो अत्यंत दुर्दैवी आहे, हा प्रकार शिवसेना ठाकरे पक्षाच्या अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केली आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.
घोसाळकरांची हत्या करणारा मॉरिस नोरान्हो यांनी चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकार हे माफियागिरी आणि गुंडगिरीला पाठबळ देत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाचे खंडन करून त्याला प्रत्युत्तर देताना उदय सामंत यांनी हे वक्तव्य केले. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून गुन्हेगारीच्या घटनांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारला वारंवार लक्ष्य केले जात आहे. अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्हो यानेही वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी मॉरिस नोरान्हो याचा कशा प्रकारे उद्धव ठाकरे गटाशीच संबंध होता, हे सांगितले. यासाठी उदय सामंत यांनी ‘सामना’ दैनिकातील कात्रणे प्रसार माध्यमांसमोर सादर केली. या माध्यमातून सामंत यांनी घोसाळकर यांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत वादातूनच घडल्याचे अधोरेखित केले.
उदय सामंत पुढे म्हणाले की, अभिषेक घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्हो चे उदात्तीकरण ‘सामना’ मधून करण्यात आले आहे. ‘सामना’तून वेळोवेळी मॉरिस नोरान्होच्या सामाजिक कार्याचा गौरव आणि त्याला पाठिंबा दिला जात होता. मॉरिसच्या कामाला ‘सामना’तून तर घोसाळकर कुटुंबीयांच्या कामाला मातोश्रीवरुन पाठिंबा दिला जात होता. राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्र्यांना जबाबदार धरणे चूक आहे. आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारायचे व त्यांना बदनाम करायचे ही जी विरोधकांची प्रवृत्ती आहे त्याला छेद देण्याची गरज आहे.
उदय सामंत पुढे म्हणाले की, अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला विनाकारण लक्ष्य करण्याऐवजी मॉरिस नोरान्हो आणि अभिषेक घोसाळकर यांना आपापसात समझोता करायला लावणारी व्यक्ती कोण,याचा शोध घेतला पाहिजे. या दोघांना फेसबुक लाईव्ह करायला सांगून तुमच्यातील वाद मिटवा, असे कोणी सांगितले होते? घोसाळकर आणि नोरान्हो यांच्यात समझोता झाला होता. मात्र, हे दोघे आमचे कार्यकर्ते नव्हते. या दोघांनी ठाकरे शिवसेनेत एकत्र काम करुन पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट पोलिसांनी तपास करताना लक्षात घेतली पाहिजे. फेसबुक लाईव्हपूर्वी या दोघांची कुणाशी चर्चा झाली होती, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही उदय सामंत यांनी केली.
