द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क आता ‘नमो- द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क’.
द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क आता ‘नमो- द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क’.
ठाणे, दि. ८ फेब्रुवारी :-
आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय महत्त्वाची ठरेल, अशी ग्रॅण्ड सेंट्रल पार्क ही संकल्पना ठाण्यात प्रथमच साकारली आहे. हे उद्यान आबालवृद्धाना आनंद देणारे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी ठाण्यात केले. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या आणि कल्पतरू समूहाने विकसित केलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कचे लोकार्पण संपन्न झाले. हे “द ग्रॅंड सेंट्रल पार्क” आता “ नमो- द ग्रॅंड सेंट्रल पार्क” या नावाने ओळखले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
आमदार संजय केळकर यांनी सुचविल्याप्रमाणे या उद्यानाला, जगभरात ज्यांनी देशाचा नावलौकिक वाढवला आहे, असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात येईल. त्यामुळे या उद्यानाची ओळख ‘नमो द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क’ अशी होईल, असे मुख्यमंत्री महोदयांनी लोकार्पण सोहळ्यात जाहीर केले.
लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी संपूर्ण उद्यानाची पाहणी केली. त्यातील संकल्पनेवर आधारित विविध देशांची उद्याने, लहान मुलांसाठी असलेली खेळणी, जागा यांची पाहणी केली. क्यू आर कोड स्कॅन करून झाडाविषयी माहितीही जाणून घेतली.
राज्यातील हे सगळ्यात मोठे उद्यान आहे. त्याचा उभारणीत कुठेही गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही. सुमारे 3 हजार 500 झाडे या उद्यानात आहेत. आणखी झाडांचे नियोजन करावे. तसेच, त्याचे व्यवस्थापनही नेटकेपणाने व्हावे. कल्पतरू डेव्हल्पर्सने टीडीआरच्या माध्यमातून हे उभे केले आहे. महापालिकेचा एकही पैसा खर्च न करता हे भव्य दिव्य उद्यान उभे राहिले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अर्बन फॉरेस्ट कसे असू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. हे ऑक्सिजन पार्क आहे. कांरजे, तलाव यांचा अनुभव सगळ्यांना घेता येईल. त्याच जोडीने मिनिएचर पार्क उभे करण्यात येणार आहे. त्यात जगभरातील आश्चर्यांच्या मोठ्या प्रतिकृती येथे पाहता येतील. सगळ्यांनाच परदेशात जाता येत नाही. त्यामुळे त्यांनाही तो आनंद या मिनिएचर पार्कमध्ये घेता येईल. सेंट्रल पार्क भव्य दिव्य झाले असून हे उत्तम पर्यटन स्थळ होईल, असा विश्वास याप्रसंगी आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला. तसेच, या उद्यानाचे नामकरण नमो ग्रॅण्ड सेंट्रल पार्क असे करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
ठाण्यात या सेंट्रल पार्क पाठोपाठ एक स्नो पार्क (बर्फ उद्यान) ही विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले. हे स्नो पार्क ही ठाणेकरांसाठी मेजवानी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईप्रमाणेच ठाण्यातही सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरू आहे. त्यात मुख्य रस्ते घेतले आहेत. आता त्यात अंतर्गत रस्तेही घ्यावेत. डेब्रिज, माती पूर्ण काढावी आणि ठाण्यात कुठेही कचरा सापडणार नाही, अशी स्वच्छता करावी, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
