सत्तेच्या मोहापायी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली.
सत्तेच्या मोहापायी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली.
मुंबई, दि. २३ जानेवारी:
आपल्या अहंकारापायी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले,त्यांच्या विचारांना तिलांजली दिली. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी कधीच जवळ केले नाही, त्या काँग्रेसला सत्तेच्या मोहापायी व खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी कडेवर घेतले. निवडणूक एकाबरोबर जिंकल्या आणि सरकार दुसऱ्यासोबत स्थापन केले. यांच्या अहंकारामुळे राज्य मागे गेले. म्हणून राज्याच्या हितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी आम्ही ते सरकार उलथवून लावून जनतेचे सरकार स्थापन केले. सत्तेच्या लालसेपोटी ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, त्यांना प्रभू श्रीराम सुबुद्धी देवो हीच प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज ते आमचा विरोध करतात, आम्हाला रावण म्हणतात. राम कोण आणि रावण कोण हे सर्व जनतेला ठाऊक आहे. ज्यांनी राममंदिराला विरोध केला, प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला, त्यांना रामाबद्दल बोलण्याचा काही एक अधिकार नाही. जो राम का नही, वह किसी काम का नही. जी अवस्था अहंकारी रावणाची झाली, तीच अवस्था यांची होईल.
बाळासाहेबांचे विचार घेऊन त्यांच्या विचारांना अभिप्रेत सरकार स्थापन केले. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असायचे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाजातील सर्व घटकांना, महिला, शेतकरी, युवावर्ग, अबालवृद्धांना न्याय देण्याचे काम करत आहोत. बाळासाहेब ठाकरे हे सर्वांगीण विकासाला आणि स्वच्छता व आरोग्याला प्राधान्य द्यायचे म्हणून त्यांच्या नावाने आपण ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग’ सुरु केला. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु केला. ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख कार्यक्रम सुरु केला. ज्याचा लाभ आतापर्यंत २ कोटी २० लाख जनतेने घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी अनेक निर्णय घेतले. अनेक योजना सुरु केल्या.
अयोध्येमध्ये राममंदिर व्हावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. अयोध्येमध्ये राममंदिर पूर्ण झाले, २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले आणि बाळासाहेबांचे स्वप्न पूर्णत्वास आले. मुख्य म्हणजे त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी राममंदिराचे लोकार्पण झाले, ही बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरली.
बाळासाहेबांची जयंती ही प्रत्येक शिवसैनिकांसाठी आनंदाचा क्षण म्हणून बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईतील प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेतर्फे ११ हजार दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईत केले.
