उडान तय करेगी आसमान किसका है!
मुंबई, दि. ८ जानेवारी..
राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. न्यायालयात आपल्याच बाजूने निकाल लागेल असा विश्वास व्यक्त करतानाच एक तरी खासदार आपल्याला मिळाला पाहिजे ती जबाबदारी आपण घेतली आहे ती घेऊन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
रात नही ख्वाब बदलता है, मंजिल तो वही रहती सिर्फ कारवा बदलता है…किस्मत बदले या ना बदले वक्त जरुर बदलता है…अशा शायरीतून छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना साद घातली.
एकमेकांचे पाय खेचू नका, खेकडयासारखे वागू नका एकमेकांना साथ द्या. एकजूट होऊन काम केले तर यश निश्चित तुमचे आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा आम्ही बदलली नाही. अजित पवार आणि आम्ही सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत आहोत. भविष्यात नगरसेवक, आमदार निवडून आणायचे आहेत. घरी बसला आणि मोबाईलवर मेसेज पाठवून उपयोग नाही. ‘लोकांना लढणारी माणसे आवडतात,रडणारी नाही’ तुम्ही लढा द्याल तेव्हा लोक तुमच्या सोबत येतील.
ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या हे मी बोललो आणि सगळे नेते तेच बोलत आहेत फक्त मी जास्तीचे आणि समाजाला समजेल असे बोलत आहे. तुम्ही ओबीसींमधील आरक्षण कशाला मागता. तुम्हाला दिले होते ना…ते टिकले नाही मात्र त्यावेळी असलेल्या त्रुटी दूर केल्या जात आहेत. राजकारण कोण करत असेल तर पंचायत होईल असे समजवताना गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मी आज लढतोय का? मंडल आयोगासाठी लढलो ना… पवारांसोबत लढलो. कुणाच्या हक्कावर गदा येणार नाही असे काम आपल्याला करायचे आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत. कुणाच्या दादागिरीकडे लक्ष देऊ नका…उडान तय करेगी आसमान किसका है…अशा शब्दात पक्षाचा इरादा छगन भुजबळ यांनी स्पष्ट केला.
