सत्तेतील सहभाग सर्वसामान्यांच्या हितासाठी..
सत्तेतील सहभाग सर्वसामान्यांच्या हितासाठी..
कल्याण, दि. ७ जानेवारी.
सत्तेतील सहभाग हा सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी असतो हे आज दाखवून दिले आहे. आज अजित पवार तुमचे स्वागत ग्रामीण भागात झाले याचा अर्थ तुम्ही जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरेंनी अजित पवार यांच्या निर्णयाचे कौतुक केले.
कल्याण – मुरबाड मार्गावरील वरप गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यात तटकरे बोलत होते.
बहुजनांच्या हितासाठी हा निर्णय घेतला. शाहू- फुले – आंबेडकर यांच्या विचारांशी फारकत न घेता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी देशाची प्रगती झाली आहे ती लक्षात घेता आणि बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगतानाच आज जो भव्य मेळावा घेऊन राज्यातील जनता अजितदादा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे हे जाहीर झाले आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
५३ पैकी ४३ आमदार अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहिले हीच अजित पवारांची ताकद आहे. खोटारडी पीचएडी कुणाला द्यायची असेल तर ती म्हणजे टिव्हीवर वेडेवाकडे तोंड करणारे कोण हे जनतेला माहीत आहे मला त्याचे नाव घ्यायचे नाही असेही सुनिल तटकरे यांनी नाव न घेता समाचार घेतला.
वैचारिक लढाई लढायची असते त्यातून कार्यकर्ता घडतो. नारी शक्तीची ताकद चौथे महिला धोरण जाहीर करुन अदिती तटकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक उत्तम काम केले आहे.
यावेळी अनेक पक्षातील पदाधिकार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. कल्याण – मुरबाड मार्गावरील वरप गावात हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्यादृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा होता.
या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार दौलत दरोडा, युवा नेते पार्थ पवार, ठाणे – पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री, प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला यांच्यासह रमेश हनुमंते, सोनिया धामी, किसनराव तारमाळे, प्रवीण खरात आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
