Screenshot_20240107_182012_Facebook

वय झाल्यावर थांबायचे असते !

कल्याण, दि. ७ जानेवारी –
वय झाल्यावर राजकारणात आणि इतर क्षेत्रात थांबायचे असते असा संकेत असतो परंतु काहीजण थांबायला तयार नाही. काहीजण हट्टीपणा करत आहेत. राजकारणात वयाची अट असते. मात्र वयाची ८० – ८४ ओलांडली तरी थांबायला तयार नाही. आम्ही आहोत ना सक्षम, आम्हाला मार्गदर्शन करा ना, मी कित्येक वर्षे सत्तेत काम करत आलो आहे असा टीका अजित पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे कल्याण येथील भव्य कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, यंत्रणा हलवण्याची ताकद असायला हवी त्यादृष्टीने आमचे काम सुरू असून सार्वजनिक कामे झालीच पाहिजे. कुणाला सांगायचे असेल तर ते मी सांगेन असा शब्द देतानाच आरोग्य, कला, क्रीडा या सर्व बाबींकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. सर्वसामान्य लोकांचे कल्याण या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे. जे वेगवेगळे विचार मांडत आहेत, टीका करत आहेत त्याला मी महत्व देत नाही. मी कामाला महत्त्व देतो. महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू आहे. आमचे व्हिजन क्लीअर आहे. राज्यातील जनतेचा विकास हेच ध्येय घेऊन आम्ही काम करत आहोत.

सार्वजनिक काम घेऊन हक्काने या…वैयक्तिक काम थोडं थांबवा. लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी सत्तेत गेलो आहोत. सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवत आहोत असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

देशासमोर राज्यासमोर काय प्रश्न आहे हे लक्षात न घेता सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. मुद्दयावर बोलणं सोडून इतर विषयावर बोलत आहेत. काहीजण मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात आदेश सांगितला आहे. त्याचा आदर राखून राज्यातील, देशातील सरकार काम करत आहे परंतु कायदा हातात कुणी घेतला तर त्याचा मुलाहिजा राखला जाणार नाही असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

मान आणि शान वाढविण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखाली झाले आहे. भारत देश प्रत्येक क्षेत्रात आगेकूच करत आहे. तरुण – तरुणींच्या हाताला काम कसे मिळेल असा प्रयत्न सुरु आहे. ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले जात आहे. घरकुल योजना राबवली जात आहे. काहींना नोकरी व काहींना व्यवसाय दिला जात आहे. शेतकऱ्यांना सहा हजार केंद्र व राज्यसरकार सहा हजार असे बारा हजार रुपये देत आहोत हेही अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.

आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे जे नवीन लोक पक्षात प्रवेश करणार आहेत त्यांच्यात आणि आपल्यात अंतर पडू देऊ नका. आपल्याला जातीपातीचे राजकारण करायचे नाही. अल्पसंख्याक समाजाला जास्तीत जास्त निधी देण्याचे काम केले आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *