धारावी प्रकल्प मोदींचे मित्र अदानींची भरभराट करणारा..
धारावी प्रकल्प मोदींचे मित्र अदानींची भरभराट करणारा..
मुंबई, दि. ५ डिसेंबर :
मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या तोफा उठवल्या जात आहेत. काँग्रेस व शिवसेनेचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे तर भाजपा मात्र त्याचे समर्थन करत आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शेलारांचा समाचार घेत गायकवाड म्हणाल्या, शेलार खोटे बोलत आहेत, सत्य तर हेच आहे की, आपल्या भ्रष्ट, मित्रजीवी सरकारच्या मनातच काळबेरं आहे. धारावी आणि मुंबईच्या विकासाच्या पोकळ बाता मारणे सोडा… तुमचा पुनर्विकास मॉडेल म्हणजे केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परम मित्र अदानी यांचीच भरभराट करणारा मॉडेल आहे, हे सर्वश्रुत आहे.
सत्य तर हेच आहे की, अदानी समुहाला वारेमाप एफएसआय (FSI) देत असताना त्यांचे खिसे भरण्यासाठी निविदा प्रक्रियेत आणि विकास नियंत्रण नियमांत ढवळाढवळ करता आणि ७ लाखांहून अधिक धारावीकरांना धारावीतून हलवण्याचा कट आपण रचला आहे.
आपल्या मेहनतीतून, कष्टातून आणि एकजुटीतुन धारावीकरांनी धारावी नावारूपास आणली. तिला स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. आज धारावीतील लघु व मध्यम उद्योगांमुळे या सरकारला १०० कोटी रुपयांचा उत्पन्न मिळतो. तेव्हा पुनर्विकास कसा असावा तर धारावीकरांच्या गरजा, इच्छा-आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण करणारा असावा.. त्यांचे भविष्य साकारणारा असावा.
धारावीचे ठरले आहे..पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईकरांची तसेच धारावीकरांची ही लूट आम्ही कदापि होऊ देणार नाही. सर्वसामान्यांच्या गरजा, इच्छा व आकांक्षाना प्राधान्य न देणारा विकास धारावीकरांना अजिबातच नकोय. आम्ही धारावीकर याविरुद्ध कायमच रान उठवत राहू असे वर्षा गायकवाड यांनी ठणकावून बजावले आहे.
