लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे भूमीपूजन..
लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे भूमीपूजन..
ठाणे, दि. २० नोव्हेंबर ;
आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. आपल्या देशाची शान असलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतर ठेवणारे स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमीपूजन ठाण्यात होत आहे. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या “महानगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सोयीसुविधांचा विकास” या योजनेंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंड, वर्तकनगर, ठाणे येथे भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उभारण्याच्या कामाचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व ज्येष्ठ गायिका व संगीतकार श्रीमती उषा मंगेशकर, आमदार. प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, सर्व युगांप्रमाणे “लता युग” हे देखील अविस्मरणीय आहे. त्यांची गाणी आजही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. आपल्या सर्वांनाच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लतादीदींची गाणी हवीहवीशी वाटतात. या विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाकडून 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज पं. राम मराठे, पी.सावळाराम, श्रीनिवास खळे हे ठाण्यातीलच. भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) गायन-संगीत प्रेमींना निश्चितच उपयुक्त ठरेल. या वाटचालीत शासन मंगेशकर कुटुंबियांच्या कायम सोबत असेल.
इतर विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. ठाण्याचा सर्वांगीण विकास होतोय, अजूनही होईल. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर सुशोभिकरण, स्वच्छतेकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातही काम सुरु केले जाणार आहे. जुन्या विहिरींचे पुनर्जीवन करण्याचे काम सुरू, 50 कोटी निधी दिला आहे. “वापरा आणि फेका” ही आपली संस्कृती नाही. जुना अनमोल ठेवा जपायला हवा, त्याचे संवर्धन करायला हवे. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यावर खूप प्रेम होते, मी त्यांच्याच आशिर्वादाने मुख्यमंत्री झालो आहे. त्यांच्या विचारधारेवरच मी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत आहे.
ग्लोबल वार्मिंग या जागतिक समस्येवर मात करण्यासाठी जागोजागी झाडे लावणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नशील असून “अर्बन फॉरेस्ट” ही संकल्पना लवकरच राबविण्यात येणार आहे. मोठमोठ्या शहरांमधील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी जबाबदारीने, झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे, याची पूर्ण जाणीव असल्यानेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साथीने आम्ही सर्व मिळून जनसामान्यांसाठी अहोरात्र काम करीत आहोत. बंद झालेले अनेक लोकोपयोगी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आले असून काही नवीन प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. हे सर्वसामान्यांचे शासन आहे, शेवटपर्यंत त्यांच्या हितासाठीच काम केले जाईल, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष भेट दिली आणि मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ठाण्याचे बदलते रूप पाहून मनापासून आनंद होत आहे. या ठाण्याला साजेशी अशी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) ची इमारत लवकरच उभारली जाणार आहे. त्याचा लाभ ठाणे व आसपासच्या परिसरातील लहान मोठ्या सर्वच वयोगटातील गायन-संगीतप्रेमी घ्यावा. श्रीमती मंगेशकर यांनी हे संगीत विदयालय चालविण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांकडे सोपविल्याबद्दल शेवटी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक यांनी मनोगत व्यक्त करताना ठाणे शहरातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सुरु असलेल्या व नजीकच्या काळात सुरु होणाऱ्या विविध विकासकामांविषयी माहिती दिली व या विकासकामांसाठी भरघोस निधी देवून सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष आभार मानले.
