नरोदा दंगल प्रकरणी कायदा आणि संविधानाची हत्या…
नरोदा दंगल प्रकरणी कायदा आणि संविधानाची हत्या…
मुंबई दि. २१ एप्रिल –
गुजरातमधील नरोदा दंगलीतील ज्या लोकांची हत्या झाली. ती हत्या कशाने झाली. जर कुणी हल्लाच केला नाही तर हत्या झाली कशी? हत्या होते आणि हत्येकरु निर्दोष सोडले जातात म्हणजे एकादृष्टीने ज्यांची हत्या झाली त्यांचीही हत्या झाली तेही गेले आणि या देशात जो कायदा आहे जी कायद्याची व्यवस्था आहे. जे संविधान आहे त्या कायदा आणि संविधानाचीसुध्दा हत्या झाली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी गुजरात निकालावर आपली नाराजी व्यक्त करत भूमिका मांडली.
काही वर्षापूर्वी गुजरातमध्ये धार्मिक हिंसेत जी हत्या झाली. ही जातीय दंगल होती. यामागे गुजरातमधील सत्ताधारी पक्ष होता. त्यात ज्यांना अटक झाली. त्यात एक महिला होती. त्या मंत्री, आमदारही होत्या. इतके दिवस ती केस चालली त्या लोकांना अटक झाली आणि लगेचच जामीन दिला आणि केस वर्षानुवर्षे सुरू राहिली आणि त्या केसचा निकाल लागला त्यातील सर्व लोक निर्दोष म्हणून सोडले. आज जे घडले आहे ते ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी सत्तेचा वापर ज्यापध्दतीने करत आहेत ते दिसत आहे असेही शरद पवार म्हणाले.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय शिबीर आज घाटकोपर येथे कार्याध्यक्षा राखीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी केंद्रातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक, एकनाथ खडसे यांच्यावर ज्या पद्धतीने खोट्या केसेस दाखल केल्या त्याचा पाढाच शरद पवार यांनी वाचला.
सध्या राज्यात किंवा देशात जे चित्र आहे ते चिंताजनक आहे. अनेक गोष्टी देशात घडत आहेत. त्या घडल्यानंतर त्यावर पडदा टाकण्याचे काम केले जात आहे. वस्तुस्थिती व त्यातली सत्यस्थिती लोकांसमोर येऊ नये याची काळजी घेतली जाते आहे असा थेट आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला.
काश्मीरचे राज्यपालांनी निवृत्तीनंतर देशासमोर काही गोष्टी मांडल्या. त्यामध्ये पुलवामा याठिकाणी भारतीय सैनिकांवर जो हल्ला झाला त्यात ४० पेक्षा जास्त जवान मृत्युमुखी पडले. हे का पडले. त्या प्रकरणाची चौकशी झाली का? आजपर्यंत हे आमच्यापुढे आले नाही. संसदेत ऐकले नाही. पण राज्यपालांनी सांगितले की, जे ४० जवान मृत्युमुखी पडले ती धोक्याची जागा होती. त्यांना नेण्यासाठी लष्कराचे विमान मागितले होते परंतु ते दिले नाही त्यामुळे जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेवर बाहेर बोलू नका हे वरिष्ठांनी सांगितले असे राज्यपाल सांगत आहेत. हे सांगतानाच शरद पवार यांनी देशाचे रक्षण करणारे काश्मीरमध्ये जवान जातात त्यावेळी त्याची चौकशी सुध्दा करायची नाही. त्यातील सत्य लोकांसमोर येता कामा नये याची खबरदारी घेतात याचा अर्थ स्पष्ट आहे आज देशातील सर्वसामान्य लोकांच्या संरक्षणाची त्यांच्या हिताची जबाबदारी ज्या केंद्रसरकारवर आहे त्यांनी योग्य प्रकारची पावले टाकलेली नाहीत असा हल्लाबोलही केला.
