ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेरला निलंबित करा.
ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेरला निलंबित करा.
मुंबई दि. २२ मार्च –
महेश आहेर ठाणे पालिकेचा अधिकारी आहे, सिक्कीम युनिव्हर्सिटी येथून बी.कॉम झालेला आहे अशी माहिती त्याने दिलेली आहे. पण माहिती काढली तिथल्या उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींमध्ये हे नाव नाही. हा ठाणे सहाय्यक आयुक्त कसा होऊ शकतो ? दहावी पास व्यक्ती ठाण्यासारख्या शहराच्या उच्चस्थानी बसत असेल, प्रशासनात बसत असेल तर हे गंभीर आहे. त्यामुळे तो तिथपर्यंत कसा गेला याचा खुलासा व्हायला पाहिजे, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.
या महाशयांची बरीच प्रकरणे आहे. याबाबत खोलात जात नाही परंतु ज्याचा हिरानंदानीमध्ये फ्लॅट आहे त्याला प्रकल्पबाधित म्हणून लाभ मिळाला आहे. ही शंका उपस्थित करणारे आहे. ठाण्यात काय सुरू आहे ?चुकीचा पायंडा पाडला जात आहे. मला वाटत नाही देवेंद्र फडणवीस यांना हे पटेल, ते हळूहळू मुख्यमंत्र्यांपर्यंतही येऊ शकते. त्यामुळे आहेर यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे होते. विधिमंडळातील सदस्यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी करावी लागत आहे. देवेंद्र फडणवीस याला आळा घालतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सत्ता कधीच बदलणार नाही अशा अविर्भावात अधिकारी वागत आहेत. त्यामुळे आहेरला निलंबित करा, त्यासंदर्भात समिती स्थापन करा आणि महिन्याच्या आत अहवाल सादर करून दोषी असल्यास कठोर कारवाई करा अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.
