शेतकऱ्यांचे व्यावहारिक ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून काम करण्याची गरज

0
IMG-20220513-WA0049

शेतकऱ्यांचे व्यावहारिक ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून काम करण्याची गरज..

रत्नागिरी, दि. 13 मे :

विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार  सर्वांनी काम करावे आणि अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल असे प्रतिपादन महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सुवर्ण पालवी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन राज्यपाल महोदयांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.


रत्नागिरी जिल्हयाला निसर्गाने भरभरुन दिले आहे. एका बाजूला डोंगररांगा दुसऱ्या बाजूला सागर किनारा असणाऱ्या या जिल्हयाची ओळख हापूस आंब्यामुळे संपूर्ण जगास आहे. यापूर्वीच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या. प्रथम श्वेतक्रांती नंतर हरित क्रांती आणि आता निलक्रांती  धोरण स्वीकारण्यात आले आहे असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

प्रत्यक्षात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे व्यावहारिक ज्ञान मोठया प्रमाणावर आहे तर विद्यापीठात शेती विषयक विज्ञान व संशोधन आहे. याची सांगड घालण्याचा प्रयत्न या चार दिवस चालणाऱ्या  प्रदर्शनात व्हायला हवा असेही राज्यपाल यांनी सांगितले.

जिल्हयात विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य वातावरण असावे यासाठी अभ्यासिका उभारण्यात येत आहे. याचा वापर शेती विज्ञान आणि संशोधन यासाठी होणार असेल तर अभ्यासिकाची इमारत विद्यापीठास देण्याची तयारी आहे असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात केले.

डॉ. बाळासाहेब सावंतांसारखी व्यक्ती रत्नागिरी तालुक्यात जन्मली हे आमचे भाग्य आहे. त्यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवास मी शुभेच्छा देतो असेही सामंत म्हणाले. यंदा मान्सून चांगला राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे आणि आताच्या स्थितीनुसार मान्सून लवकर येण्याचीही शक्यता आहे. या स्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार खते आणि बियाणे पुरविण्यास शासन तयार आहे असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *