धान उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा होणार
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट खात्यात पैसे जमा होणार
मुंबई, दि. २८ डिसेंबर :
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी जो धान उत्पादक शेतकरी आहे त्याच्या डायरेक्ट खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले.
विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील घोषणा केली.
मुळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे जाण्याऐवजी बर्याचदा व्यापारी वर्गाकडे पैसे जातात. आजुबाजुला असणाऱ्या राज्यातही धानाला बोनस दिला जातो. मात्र त्या राज्यातील धानही आपल्या राज्यात येते आणि तेपण बोनसचा फायदा घेतात. बाहेरच्या राज्यातील धान येऊन आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये त्यांचा फायदा व्हावा यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली होती असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
या सगळ्याचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यात पैसे मिळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जे खरे धान उत्पादक आहेत त्यांना पैसे मिळतील. त्यांच्या नावाखाली नको ती दुकानदारी चाललेली आहे ती फार मोठी आहे याचा विचार मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले.
