नागपूरच्या खाजगी रुग्णालयांनो,खबरदार!
कोविड पेशंटला खाजगी रुग्णालयांनी भरमसाठ बिल आकारल्यास कारवाई.
नागपूर, दि. ०३ ऑगस्ट,२०२०
कोव्हिड-१९ च्या संदर्भात शहरातील खाजगी रुग्णालयांकरिता नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीच्या अंमलबजावणीकरिता भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी (आय.ए.एस.) तथा अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात मनपातर्फे विशेष पथक गठीत करण्यात आले आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश निर्गमित केले आहे.
नागपुरातील कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता खाजगी रुग्णालयांमध्येही तपासणी आणि उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतू हे करताना चाचणी, तपासणी आणि उपचार यासाठी शासन आणि प्रशासनाने दर निश्चिती केलेली आहे. कोव्हिड आणि कोव्हिडसाठी नसलेल्या रुग्णालयांसाठी शासनाची नियमावली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार रुग्णालयातील ८० टक्के बेड राखीव असावेत. २० टक्के बेडसाठी रुग्णालय व्यवस्थापनाच्या दरानुसार दर आकारू शकतात. या सर्व नियमांचे अनुपालन करणे सर्व रुग्णालयांना बंधनकारक आहे. या संदभातील आदेशाची अंमलबजावणी होते अथवा नाही याची पाहणी करून नियंत्रण ठेवण्याकरिता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पथक निर्धारित केले आहे. पथक प्रमुख अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा हे असून पथकाद्वारे शहरातील विविध खाजगी रुग्णालयांची आकस्मिक तपासणी केली जाणार आहे. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णालयांच्या संदर्भातील कार्यवाहीचा अहवाल मनपा आयुक्तांना सादर करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी खाजगी रुग्णालयांकडून दर आकारणी संदर्भात मनपाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. यापुढेही जर असे काही आढळल्यास, शासनाच्या नियमांचे उल्लंघन नागरिकांनी मनपाकडे तक्रार करावी. तयार करण्यात आलेले पथक त्याची त्वरित दखल घेईल, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. अशा रुग्णालयांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा व अन्य संबंधित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
