आता सोयाबीन उत्पादक शेतक-याला चांगला भाव मिळेल
आता सोयाबीन उत्पादक शेतक-याला चांगला भाव मिळेल.
मुंबई, दि. 11 डिसेंबर :
देशांतर्गत बाजारपेठेत मुबलक सोया पेंड शिल्लक असल्याने यावर्षी सोयाबीन पेंड आयात न करण्याचा निर्णय मोदी सरकारने नुकताच घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे, असेही पाशा पटेल यांनी नमूद केले.
पटेल यांनी सांगितले की, कुक्कुटपालन व्यावसायिक सोयाबीन पेंडीची आयात करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करत आहेत असे समजल्यावर दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. कुक्कुटपालन व्यावसायिक चुकीच्या आकडेवारी द्वारे सोयाबीन पेंडीच्या आयातीची मागणी करत आहेत. ही मागणी मान्य करू नका, असे निवेदन गोयल यांना दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गोयल यांना व वाणिज्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोयाबीन पेंडीच्या आयातीची मागणी मान्य करू नका असे सांगितले. देशांतर्गत बाजारपेठेत १३ लाख मेट्रिक टन सोयाबीन पेंड शिल्लक असतानाही कुक्कुटपालन व्यावसायिक चुकीची आकडेवारी सादर करत आहेत. देशांतर्गत उपलब्धतेचा अंदाज घेऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सोयाबीन पेंडीच्या आयातीचा विचार नसल्याचे जाहीर केले.
मागील वर्षी जून मध्ये देशात सोयाबीन पेंडी चा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे त्यावेळी कुक्कुटपालन व्यावसायिकांनी पेंडीच्या आयातीची मागणी केल्यावर शेतकऱ्यांनी या मागणीला विरोध केला नाही. मात्र जूनमध्ये आयातीचा निर्णय झाल्यावर ही सोया पेंड देशात ऑगस्ट , सप्टेंबरमध्ये आली त्यावेळी देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनची आवक सुरु झाली होती. आयात पेंडीमुळे सोयाबीनच्या भावात घसरण झाली. सध्या देशात भरपूर सोया पेंड शिल्लक असल्याने आयातीची गरजच नाही, असेही पटेल यांनी सांगितले.
