शेतकरी रेट्यापुढे ‘सरकार’ झुकले, कृषी कायदे मागे !

0
IMG_20211119_093803

शेतकरी रेट्यापुढे ‘सरकार’ झुकले, कृषी कायदे मागे !

नवी दिल्ली, दि. १९ नोव्हेंबर:
केंद्रातील भारतीय जनता पक्षाला शेतकरी आंदोलनासमोर अखेर झुकते घ्यावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे.सकाळी देशाला संबोधित करताना मोदींनी तीन कायदे मागे घेत आहे असे जाहीर करत संसदेच्या अधिवेशनात त्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले तसेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घरी परतावे असे आवाहनही केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गुरुनानक यांचा प्रकाशाचा आज पवित्र सण आहे.आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो. प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना त्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्‍यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. कृषी अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी यांनीही कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, हे शक्य झालं नाही. मी आज देशवासियांची क्षमा मागत स्वच्छ मनाने हे सांगू इच्छितो की कदाचित आमच्याच तपस्येत काहीतरी कमी राहिली. ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशासारखं सत्य काही शेतकरी बांधवांना आम्ही समजावू शकलो नाही असे म्हणत पंतप्रधानांनी देशाची माफीही मागितली.

शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी तीन कृषी कायदे आणले. त्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळावी यासाठी आम्ही हे कायदे केले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक शेतकरी संघटनांनीही याला पाठिंबा दिला होता.

कृषी कायदे रद्द करावेत म्हणून वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. उत्तर भारतात या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. आजही दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. या आंदोलनाला भाजपाने खलिस्तानी, देशद्रोही, आंदोलनजीवी, नक्षलवादी म्हणून हिणवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही. परंतु आज सरकारला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *