कल्याण डोंबिवलीमध्ये कोविड समर्पित काळजी केंद्र ! 

0
20200726_130010
मुंबई, दि. 26 : 
कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.
संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले. आज आपण या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढवत आहोत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे. राज्यात 131 प्रयोग शाळा उभारण्यात आल्या आहेत.
कोरोनाबाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधा आणि साथीचे प्रमाण व्यस्त आहे.  प्रभावी औषधे हातात येईपर्यंत आपल्याला अधिक सजग असणे आवश्यक आहे. गलथानपणा, ढिलाई आपल्याला परवडणारी नाही. आपल्याकडे सुरु असलेल्या उपचारांची गाईडलाईन तपासून घेणे आवश्यक आहे. राज्याच्या टास्कफोर्स कडून संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
या संकटात सर्व यंत्रणा न डगमगता पाय रोवून उभे राहिलात त्यामुळे तुमचे मन:पूर्वक धन्यवाद देतो असे सांगुन ते म्हणाले की,संपूर्ण राज्यात जेथे आवश्यकता असेल तेथे प्रयोगशाळा तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य देण्यात येईल. कोरोना व्हायरसला हरविणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान असले तरी आपण एकजुटीने त्यावर मात करु असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.
डोंबिवली कोविड केंद्र….
डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात कच्छी कडवा पाटीदार समाज, मुंबई यांनी पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध करुन दिली असून सदर इमारत ही तळ + 4 मजल्याची आहे. पहिल्या मजल्यावरील सुमारे 5000 स्क्वे.फीट च्या प्रशस्त जागेत 70 बेड त्यापैकी 60 ऑक्सिजन सुविधा असलेले व 10 सेमी आयसीयू बेड असणार असून दुसऱ्या मजल्यावर काम करणारे डॉक्टरर्स, त्यांचा रहिवास, रेस्ट रुम, त्यांचे कार्यालय असणार आहे. तिसऱ्या मजल्यावरती 5000 स्के.फीटच्या प्रशस्त जागेत ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड व 4 थ्या मजल्यावर देखील ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड रुग्णांकरिता उपलब्ध असणार आहेत. बेसमेंटमध्ये कॅन्टींग सुविधा उपलब्ध असून सीसीटीव्ही कॅमेरे व रुग्णांकरिता उदवाहन देखील पाटीदार समाजाने पुरविले आहे. सदर रुग्णालयात रुग्णांसाठी पंखे, वॉयफाय सिस्टिम तसेच रुग्णांचे तणावरहीत वातावरणात राहण्यासाठी मंद सुरावटीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात 1 रुपी क्लिनिक डॉ. राहुल घुले यांचेमार्फत चालविण्यात येणार असून एकुण 2 एमडी फिजीशियन, 25 निवासी डॉक्टर, 50 परिचारिका व 30 हाऊसकिपींगचा स्टाफ रुग्णांचा सेवेसाठी तैनात राहणार आहे.
कल्याण पश्चिम येथील आसरा फाऊंडेशनच्या प्रशस्त जागेत कोविड आरोग्य केंद्र उभे राहत असून त्यामध्ये 100 ऑक्सिजनचे बेड, 84 नार्मल बेड, 10 सेमी आयसीयू बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. या सेंटरमध्ये 12 डॉक्टरर्स, 20 नर्सेस, 20 वॉर्ड बॉय आणि फिज‍िशियन देखील उपलब्ध असतील.
कल्याण पश्चिम गौरीपाडा येथे महापालिकेचे स्वत:चे सुसज्ज स्वॅब चाचणी केंद्र पी.पी.पी. तत्वावर क्रष्णा डायग्नोस्टिक यांच्या माध्यमातून तयार होत असून तेथे दररोज 3000 चाचण्या होवू शकतात.
यावेळी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोरोनाची आव्हान पेलण्यासाठी ठाणे जिल्हा सज्ज असून येणाऱ्या काळात या भागातील संसर्ग परिणामकारकरित्या रोखू तसेच उत्तम सुविधांची उभारणी करू असा विश्वास व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविले आहे.  महापालिका व लोकप्रतिनिधी एकत्र मिळुन काम करतायेत त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो आहे असे सांगितले. तसेच महापालिकांना आर्थिक मर्यादा आहेत परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक त्या सुविधा   उपलब्ध होत आहेत. ट्रॅकींग व ट्रेसिंगवर विशेष भर देण्यात येत असून येथील नागरिकांना सर्व सुविधा कल्याणमध्येच उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका काय उपाययोजना करीत आहे त्याविषयी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *