माजी मुख्यमंत्र्यांच्याच गावातील कोविड सेंटरची मान्यता रद्द !

0
Darekar satara

सातारा, दि. १५ जुलै २०२०

माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे गाव कराड येथील शासकीय कॉटेज हॉस्पिटलची कोविड सेंटरची मान्यता रद्द करावी लागत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय ? कराड शासकीय कॉटेज हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटलची मान्यता दिली होती. परंतु तेथे योग्य इमारत नाही, सोयी-सुविधा नाही, आरोग्य व्यवस्थेचा तुटवडा आहे. तेथे काम करणा-या नर्सेसना कोरोना प्रार्दुभाव झाल्यामुळे हॉस्पिटलची कोविडची मान्यता रद्द करण्याची नामुष्की आली. ही परिस्थिती जर माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान सत्ताधारी पक्षाच्या महत्वाच्या नेत्याच्या गावात असेल तर महाराष्ट्राचे काय असा सवाल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

दरेकर यांना सातारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची पाहणी करून पत्रकारांना माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात राजकीय इच्छाशक्तीचा जो अभाव दिसून येत आहे तोच या जिल्ह्यातही दिसून येत आहे. लॉकडाऊन सारखा निर्णय हा येथील पालकमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या आमदार, लोकप्रतिनिधी आदींना विश्वासात घेऊन घ्यायला हवा, केवळ लहर आली म्हणून लॉकडाऊन करणे योग्य नव्हे. शिरवळ येथील क्वारांटाईन सेंटरमध्येही दुरावस्था आहे. राज्यामध्ये जिल्हाधिका-यांना वाटले तर लॉकडाऊन, पालकमंत्र्याच्या मनात आले तर लॉकाडाऊन अशी स्थिती आहे.

लॉकडाऊन करण्यापूर्वी येथील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, समाजातील महत्त्वाचे घटक यांचीही मते घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्याचाही विचार करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेतले नाही.

सातारामध्ये कोविडची परिस्थिती गंभीर आहे. येथे सुमारे ४० टक्के मनुष्यबळाची कमतरता आहे. राज्य सरकार एका बाजूला कोविडसाठी सुसज्ज खाटांची इमारती,  खासगी रुग्णालये, क्वारांटाईन सेंटर उभे करित असले तरी साता-याच्या शासकीय रुग्णालयात मुख्य फिजीशिअनच नाही. १० ते १२ डॉक्टर व ५० टक्के नर्सेसची कमतरता असून येथील वैदयकीय पदे तात्काळ भरण्याची आमची मागणी आहे. जिल्हा रुग्णालयातही केवळ ६ वेंटिलेटर्स असून ही संख्या अपुरी आहे. सातारामध्ये संकटाची स्थिती असून जिल्हाधिका-यांनी आता युध्दपातळीवर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारा सारख्या मोठ्या जिल्ह्यात स्वॅब सेंटर नाही. चाचणीचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवावे लागतात हे दुदैर्वी आहे. अजूनही हे सेंटर मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे. सेंटर साठी साधारण एक कोटीची निधी लागतो. त्यामुळे हे सेंटर उभारणे गरजेचे आहे, पण यामधूनच सरकारची अनास्था दिसून येते अशी टीकाही दरेकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *