Ads

--

ऑक्सीजन तुटवड्याला केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास कारणीभूत !

By Xtralarge News

April 28, 2021 11:01 am

Ads

ऑक्सीजन तुटवड्याला केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास कारणीभूत !

देशाच्या दुरावस्थेला जबाबदार आरोग्य मंत्र्याला पदच्युत करा.

कराड , 28 एप्रिल 2021 :
ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने “भारताचा ऑक्सीजन पुरवठा अत्यंत सुस्थितीत extremely comfortable आहे” असे सांगितले होते. तसेच ऑक्टोबर २०२० मध्येच १ लाख टन वैद्यकीय ऑक्सीजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे असे देखील सांगितले होते. अशा फाजील आत्मविश्वासामुळे आज देश गंभीर संकटात असून मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे .

मोदी सरकारवरचा समाचार घेताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्रीय आरोग्य सचिवांच्या 20 ऑक्टोबर 2020 ला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते की सरकारने अतिरिक्त 1 लाख MT ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरु केली. परंतु मोदी सरकारने ती कार्यान्वित केली नाही, त्यामुळे आज देशाला अभूतपूर्व ऑक्सिजन तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दवाखाने आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे मिनिटा-मिनिटाला हताश फोन येत आहेत. रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या बातम्या देशभरातून येत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दिल्लीतील खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. हे अत्यंत विदारक चित्र आहे.

ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत “आपण अत्यंत सुस्थितीत (extremely comfortable) आहोत ” हा दावा आरोग्य मंत्रालयाने कशाच्या आधारावर केला होता? एक लाख मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन आयातीचे काय झाले ? 5 महिन्यात ते का आयात केले नाही ? ही प्रक्रिया कोणी थांबवली? आतापर्यत देशभरात मंजूर केलेल्या 162 PSA पद्धतीचे ऑक्सीजन निर्मिती प्लॅन्ट पैकी फक्त 33 दवाखान्यातच उभा केले आहेत, हे खरे आहे का?
या प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने द्यावीत अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2021 मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना “भारताने कोरोनाला कसे हरवले” अशा वल्गना करून स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्याचा हास्यास्पद प्रकार आता अंगलट येत आहे. जगातील 50 पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्यासमोर हात पसरावे लागत आहेत.

आज देशाला मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सीजनअभावी मृत्युमुखी पडले त्यांना उत्तरे हवी आहेत. देशाच्या या दुरावस्थेला जबाबदार असलेले आरोग्य मंत्री आणि इतर जबाबदार सहकाऱ्यांना तातडीने पदच्युत केले पाहिजे अशी मागणी चव्हाण यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment