Ads

--

बांधकाम व्यवसायिकांना थेट नद्यांमधून पाणी उचलण्यास स्थानिकांचा विरोध !

By Xtralarge News

March 15, 2021 3:15 pm

Ads

बांधकाम व्यवसायिकांना थेट नद्यांमधून पाणी उचलण्यास स्थानिकांचा विरोध !

निर्णयास स्थगिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे..
ठाणे, दि. 15 मार्च:

पाटबंधारे विभागाने ठाणे व पुणे जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायिकांना आपले गृह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नद्यांमधून थेट पाणी उचलण्याची दिलेल्या परवानगीस आता स्थानिकांमधून विरोध होत असून पाटबंधारे विभागाच्या या निर्णयास स्थगिती देण्याची मागणी एक मुखी फाउंडेशनने शहापूर तालुका तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील भातसा, उल्हास, काळू, वैतरणा या नद्यांच्या पाण्यावर स्थानिक शेतकरी भाजीपाला, वीटभट्टी यासारख्या व्यवसायातून आपली उपजीविका करतात. शहापूर तालुक्यातील भातसा नदीचे पाणी तर नदीकिनारी असलेल्या गावांना पिण्यासाठी वापरले जाते. पुढे याच नदीचे पाणी मुंबई शहराला ही पुरविले जाते. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तालुक्यातील अनेक गाव, पाड्यांना मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात होते त्यातच ठाणे जिल्ह्यातील वाढते नागरीकरण तसेच समृद्धी महामार्ग व त्यांना समांतर विकसित होणारे स्मार्ट सिटी साठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होऊ शकतो.

स्थानिकांच्या हक्काचे पाणी पळवले जाणार असल्याने शेती आधारित उद्योग तर संकटात येतीलच शिवाय पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. या निर्णयाचे ग्रामीण भागावर होणारे दूरगामी दुष्परिणाम पाहता पाटबंधारे विभागाचा हा निर्णय त्वरित स्थगित करण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांना निवेदनातून घातले आहे.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष रामनाथ दवणे, सचिव विनोद लुटे कार्याध्यक्ष वसंतकुमार पानसरे, निलेश डोहाळे, नितीन कुडव आदी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment