कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन रोजगार कौन्सिलिंग !

मुंबई, दि. १ जुलै २०२०

राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगारविषयक तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध रोजगारविषयक अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत आता ऑनलाईन कौन्सिलिंग सत्र आयोजित करण्यात येत आहेत. प्रायोगिक तत्वावर २४ व २५ जून रोजी उस्मानाबाद व सातारा येथे ऑनलाईन कौन्सिलिंग सत्राचे आयोजन करण्यात आले. याला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशा सत्रांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

या सत्रांमध्ये तरुणांना विविध क्षेत्रातील मान्यवर व्याख्यात्यांचे मार्गदर्शन होईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन कौन्सिलिंग सत्रांचे आयोजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन कौन्सिलिंगचे वार्षिक कॅलेंडरही तयार करण्यात आले आहे. ऑनलाइन कौन्सिलिंग सत्रांमध्ये विविध क्षेत्रांमधील पुढील उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधी, जॉब रोलनिहाय रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराच्या संधी, खाजगी क्षेत्रामध्ये तसेच सार्वजनिक क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी याबाबतचे मार्गदर्शन तज्ञ व्यक्तींमार्फत देण्यात येणार आहे, असे मलिक यांनी सांगितले.

एरोस्पेस व एव्हीएशन, कृषी, होम फर्निशिंग, ऑटोमोटिव्ह, ब्युटी अँड वेलनेस, कॅपिटल गुड्स, बांधकाम, हँडिक्राफ्ट्स आणि कार्पेट, लेदर सेक्टर, लॉजिस्टिक, व्यवस्थापन व उद्योजकता, मीडिया आणि करमणूक, दूरसंचार, पर्यटन आणि आतिथ्य यासह विविध सेक्टरबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

कौशल्य विकास विभागाने उमेदवार व उद्योग यांच्या सोयीकरता www.mahaswayam.gov.in ही वेबसाईट सुरु केली आहे. वेबसाईटवरील सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच याबाबत काही अडचण असल्यास जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन  नवाब मलिक यांनी केले आहे.

Leave a Comment