Ads

-

औरंगाबाद नामांतरावर एकत्र बसून मार्ग काढू !

By Xtralarge News

January 7, 2021 4:07 pm

Ads

औरंगाबाद नामांतरावर एकत्र बसून मार्ग काढू !

मुंबई, दि. ७ जानेवारी :

औरंगाबादचे संभाजी नगर नामकरणाचा मुद्दा सध्या तापला आहे. काँग्रेसने याला तीव्र विरोध दर्शवला आहे. तर हे तीन पक्षांचे सरकार आहे. किमान समान कार्यक्रम आम्ही तिघांनी ठरवला आहे. त्यामुळे तिघांचे सरकार चालवत असताना काही विषय कधीही निघू शकतात. याबाबत एकत्र बसून चर्चा करून योग्यपद्धतीने मार्ग काढू, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार पुढे म्हणाले की, कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कुणी भावनिक मुद्दे काढले, कुणी विकासाबद्दल बोलते, कुणी नामकरणाबद्दल बोलतं. राज्याच्या ६० वर्षाच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी झाल्या. कोण औरंगाबाद बद्दल बोलते, कोण नगरबद्ल बोलते आता पुण्याबद्दलही बोलतायत, बातम्या येत आहेत, त्यामुळे आता आणखी कुणाला काय काय सुचायला लागलंय. मागणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपण अनेक विमानतळांना मान्यवरांची नांवे दिलेली पाहिली आहेत.

उत्तर प्रदेशात मायावती आल्यानंतर त्यांनी अनेक जिल्ह्यांची, शहरांची नांवे बदलून टाकली. लोकशाहीत जे निवडून येतात त्यांना बहुमताच्या जोरावर काही अधिकार असतात. त्या अधिकाराचा वापर कसा करावा हा ज्याने त्याने आत्मचिंतन करून निर्णय घ्यावा. काहींचे मुद्दे बरेच वर्ष डोक्यात होते. त्यावेळी ते पुढे रेटता आले नाही. आता त्यांना वाटतंय हा प्रश्न सुटावा. पण हा प्रश्न सुटत असताना महाविकास आघाडी टिकावी अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. योग्य तो मार्ग निघावा. विकास कामांना महत्त्व द्यावं, ही भूमिका शरद पवारांची आहे. आम्हीही याच भूमिकेचे समर्थन करून पुढे जात आहोत असे अजित पवार यांनी सांगितले.

 

No comments to show.

Leave a Comment