Ads

--

चर्चा करू पण मेट्रो कारशेड ‘आरे’मध्येच!

By Xtralarge News

December 20, 2020 5:04 pm

Ads

चर्चा करू पण मेट्रो कारशेड आरेमध्येच असावा !

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला फडणवीस यांचे उत्तर..

मुंबई, दि. 20 डिसेंबर:
कारशेड च्या जागेवरून शिवसेना भाजपामध्ये जुंपलेली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधी पक्षांना एकत्र येऊन मार्ग काढण्याचे आवाहन केले त्याला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद दिला मात्र कारशेड आरेमध्येच असावे या भूमिकेवर ते ठाम राहिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनात शंका असेल तर आज आरे कारशेडला जी जागा दिली, त्यापेक्षा एक इंच जास्त जागा भविष्यात दिली जाणार नाही असा निर्णय करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आमची एकच विनंती आहे की, आता दुराग्रह सोडून द्यावा आणि मुंबईकरांच्या हितासाठी आरेच्या जागेवर कारशेडचा मार्ग तत्काळ प्रशस्त करावा.

मेट्रो प्रकल्पात राज्य सरकारइतकाच निधी केंद्र सरकारचा सुद्धा आहे. केंद्राच्या मदतीने JICA ने या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्र सरकारने यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका घेतली; यापुढेसुद्धा सहकार्याचीच भूमिका केंद्र सरकारची असेल.

आरेच्या जागेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. आरेची जागा अंतिम झाल्यानंतर काम सुद्धा बरेच पुढे गेले आणि 100 कोटी रुपयांचा खर्चही झाला आहे. लोकशाहीत चर्चेला आमची कायमच तयारी असते आणि चर्चेतून मार्गही निघतो. असे फडणवीस म्हणाले.

 

फडणवीस पुढे म्हणाले की, प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला ?

30 मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय 4 वर्षांचा विलंब वेगळा..

कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता?बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ 80% पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार. मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

No comments to show.

Leave a Comment