Ads

बकरा मांस निर्यात आता हैदराबाद नाही नागपुरातूनच!

By Xtralarge News

June 27, 2020 9:35 pm

Ads

नागपूर, दि. २७ जून २०२०

लॉकडाऊन संपल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन हा महत्त्वपूर्ण विभाग ठरणार आहे. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण असून रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने जोडले गेले आहे. आतापर्यंत विदर्भासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात येथील बकरा मांस हैदराबाद येथून निर्यात केले जात असे. मात्र आता नागपुरातूनच बकरा मांस विदेशात निर्यात केले जाणार आहे. भविष्यात नागपूर हे बकरा निर्यातीचे मोठे केंद्र होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

केदार पुढे म्हणाले की,कळमना बाजार समितीमध्ये पशुधनासाठी मोठे आणि अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त केंद्र उभारण्यात येणार आहे. निवारा केंद्र आणि विमानतळ असे दोन ठिकाणी निर्यातीपूर्वी पशुधनाची तपासणी करणारे हे देशातील पहिले केंद्र असेल.त्यासाठी पशुसंवर्धन विभागातील शेळीपालन महामंडळाकडील आवश्यक निधी तात्काळ मंजूर करून दिला जाईल. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून कृषीपूरक व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे.

कस्टम विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच बोकड कापणी, पॅकेजिंग व विक्री आदीबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करुन निर्यात केली जाईल. निर्यातीसाठी आवश्यक सर्व तपासण्या कळमना मार्केट आणि विमानतळावर केल्या जातील. देशातील इतर विमानतळाच्या तुलनेत नागपूर येथून जास्त निर्यात होणार आहे. निर्यात करताना चांगल्या प्रतिचे, तात्काळ उपलब्ध होणारे आणि उत्तम पद्धतीचे बकरे उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल. त्यामुळे भविष्यातील निर्यातीसाठी येथील बकरा निर्यात मार्केटमध्ये मोठी मागणी वाढेल. परिणामी कृषीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसायास अधिक प्रोत्साहन मिळेल असे केदार म्हणाले.

विदर्भातील शेतकऱ्यांना केवळ शेतीवर विसंबून न राहता, त्यांना कृषिपूरक व्यवसायाकडे वळवून अतिरिक्त उत्पादनाचे स्रोत निर्माण करण्यावर पशुसंवर्धन विभागाचा भर राहणार आहे. विदर्भातील बकऱ्याचा दर्जा आणि चव उत्तम असून मोठी बाजारपेठ उभारण्याचे काम सुरु असल्याचे पशुसंवर्धन मंत्री म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment