Ads

--

शाळेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी कंत्राटी तत्वावर!

By Xtralarge News

December 12, 2020 11:10 am

Ads

राज्यातील शाळांमधील शिपाई पद आता रद्द !
शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती कंत्राटी तत्वावर!
ग्रामीण भागातील शाळेतील शिपायास फक्त 5000 रुपये!

मुंबई, दि. 12 डिसेंबर :
राज्यातील सर्व शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती यापुढे केली जाणार नाही. सध्या कार्यरत असलेले कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदं कंत्राटी पद्धतीने भरावी लागतील. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील 52 हजारपदांवर गंडातर आले आहे.

राज्यात 2005 पासून माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी आहे. मागील 15 वर्षांत हजारो कर्मचारी सेवानिवृत्त झल्यानंतर त्यांच्या ठिकाणी नवीन भरती करण्यात आलेली नाही. ज्या शाळांत शिपायांची 4 ते 5 पदे मंजूर होती त्या शाळांमध्ये आज एकही शिपाई कार्यरत नाही. आता शासनाकडून ही पदे भरणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या कार्यरत असलेले चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे रद्द होतील. नवीन भरतीऐवजी शाळांना ठोक स्वरुपात शिपाई भत्ता दिला जाणार आहे. यात शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाईगार, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर यांचा समावेश आहे.

शाळेत किती विद्यार्थी संख्येमागे किती चतुर्थ श्रेणी कर्मचारी लागू राहतील त्यांना मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत, ग्रामीण भागात किती भत्ता दिला जाईल, याचे ही निर्देश देण्यात आले आहेत. ज्या शाळांमध्ये सद्यस्थितीत एकही चतुर्थश्रेणी पद कार्यरत नाही, तिथे हा आकृतिबंध लागू असणार आहे. तर जिथे कर्मचारी कार्यरत आहेत, तिथे रिक्त असलेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता लागू राहणार आहे.

कंत्राटी तत्वावर भरल्या जाणा-या या पदासाठी मुंबई, पुणे महानगरपालिका क्षेत्रात 10 हजार रुपये, महानगरपालिका क्षेत्रात 7500 रुपये तर ग्रामीण भागात 5000 रुपये भत्ता दिला जाणार आहे. हे मानधन अत्यंत तुटपुंजा आहे. शेतात काम करणा-या महिलेला दररोज पाचशे रुपये मिळतात. महागाई प्रचंड वाढली आहे हे लक्षात घेता या मानधनावर शिपाई मिळेल का ? शाळेतील स्वच्छता कोण करणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

चुतर्थश्रेणी कर्मचा-यांनी भरती बंद करून यातही खाजगीकरण आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप केला जात आहे.

 

No comments to show.

Leave a Comment