Ads

--

काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी मोठा ओघ; अनेक नेते संपर्कात! 

By Xtralarge News

November 11, 2020 4:27 pm

Ads

काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी मोठा ओघ; अनेक नेते संपर्कात!

मुंबई, दि. ११ नोव्हेंबर:
काँग्रेस विचारांवर श्रद्धा असलेला, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून हा विचार बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. आज सातारा व ठाणे जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यभरातून अनेक नेते कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये येण्याचा ओघ वाढला असून अनेकजण संपर्कात आहेत. लवकरच ते ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसची ताकद राज्यात आणखी वाढण्यास यामुळे मदतच होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

आज गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तरूण नेते  रणजित देशमुख  व ठाणे जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केेेेला.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा गरिब, सामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष आहे. मध्यंतरी थोडा कठीण काळ आला होता त्यावेळी काही जण पक्ष सोडून गेले. ‘सुबह का भुला शाम घर वापस आये तो उसे भुला नही कहते’. काँग्रेस सोडून गेलेले काँग्रेसमध्ये पुन्हा येत आहेतच पण इतर पक्षातीलही अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तुम्ही पक्षासाठी कार्य करा, तुम्ही मोठे झालात तर पक्षही मोठा होईल. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष बळकट करा आणि काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन द्या, असे आवाहन थोरात यांनी केले.

 

No comments to show.

Leave a Comment