मुंबई, दि. २८ ऑक्टोबर:
मुंबईची लाइफलाइन पुन्हा लवकरच सर्वांसाठी सुरु होत आहे. लोकल सेवा सर्वांसाठी सुरु करण्यास ठाकरे सरकारची तयारी असून यासंबंधी रेल्वेला पत्रही पाठवण्यात आले आहे. कोणत्या वेळेत सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करता येईल याच्या वेळाही या पत्रात देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने रेल्वेला दिलेल्या पत्रामध्ये लोकल सेवा एकाच वेळी सुरु न करता टप्प्याटप्प्याने सुरु कराव्यात असे म्हटले आहे. अधिकृत तिकीट किंवा मासिक पास असणाऱ्यांना सकाळी पहिली ७.३० ची लोकल तसेच ११ ते ४.३० आणि रात्री ८ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्यास परवानगी द्यावी असे या पत्रात म्हटले आहे.
सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरु करताना गर्दीची शक्यता लक्षात घेता लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
सात महिन्यांपासून लोकल सर्वसामान्य लोकांसाठी बंद आहे. आधी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली होती. त्यानंतर महिलांसाठी परवानगी देण्यात आली. आता सर्वांसाठी लोकल सुरु होत आहे.
Leave a Comment