Ads

---

शेतीच्या बांधावरून राजकीय’थिल्लरपणा’!

By Xtralarge News

October 19, 2020 9:34 pm

Ads

सोलापूर, दि. 19 ऑक्टोबर:

राज्यातील काही भागात अतिवृष्टीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान केले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी  सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी दौरे केले पण यावेळी ही राजकीय घुरघोडी पहायला मिळाली.
केंद्राकडे मदत मागण्यात गैर काय? केंद्रातील सरकार हे देशाचे सरकार आहे, परदेशातील नाही. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यात लक्ष घाला. तुम्ही राज्याचे विरोधी पक्षनेते आणि एक जबाबदार नेते आहात. तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार पूरग्रस्त जनतेसाठी काय करेल याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही ज्या राज्याचे आहात त्यासाठी आधी काम करा. तुम्ही सध्या नियमितपणे बिहारला जात आहात. तसे थोडे दिल्लीतही जा. तुम्ही दिल्लीत गेलात तर पंतप्रधानही घराबाहेर पडतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांचे हे बोल फडणवीस यांना फारच झोंबले, त्यांनीही लगेच पलटवार केला आणि म्हणाले, मुख्यमंत्री हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहेत, इतक्या दिवसांतून दोन-तीन तासांसाठी बाहेर आला आहात तर लगेचच स्वतःची तुलना मोदींशी करू नका, सरकार चालवायला दम लागतो. केंद्राने कोणतेही पैसे थकवले नसून राज्याचा जीएसटी कमी जमा झाल्याने त्याची भरपाई केंद्र सरकार करून देत आहे, असे फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना तातडीने मदतीची गरज आहे अशावेळी केंद्राकडे मदतीसाठी बोट दाखवण्याऐवजी हिम्मत असेल राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, असे आव्हानही फडणवीस यांनी दिले.

No comments to show.

Leave a Comment