Ads

----

शिवसेनेचा बुलंद आवाज झाला ५४ वर्षांचा !

By Xtralarge News

June 19, 2020 7:01 am

Ads

शिवसेनेचा बुलंद आवाज झाला ५४ वर्षांचा !

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू, भगिनी व मातांनो….. अशा शब्दात लोकांना साद घालणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आज ५४ वर्षे झाली. बाळासाहेब ठाकरे हे अद्भूत रसायन होते. अफाट ताकद, जबरदस्त भाषण कौशल्य. आपल्या तासाभराच्या भाषणात विरोधकांवर फटकारे मारत शिवसैनिकांमध्ये स्फुल्लिंग चेतवणारे तर विरोधकांच्या मनात धडकी भरवणारे त्यांचे भाषण असायचे…शिवसेना शाखेच्या माध्यमातून मुंबईभर पसरली, नुसती पसरलीच नाही तर मुंबईत शिवसेनेचा दबदबाही निर्माण केला. ८० टक्के समाजकारण व २० राजकारण हे शिवसेनेचे सुत्र…सामान्य लोकांच्या अडचणीत धावून जाणारा शिवसैनिक, एखाद्याला सरळ करण्यात किंवा वेळप्रसंगी कानाखाली आवाज काढायलाही शिवसेनेने कधी मागेपुढे पाहिले नाही. शिवसेनेचा दबदबा एवढा होता की शिवसेना स्टाईल’ समज द्यावी लागेल असे  म्हणताच भले-भले सुतासारखे सरळ होत. सामान्य लोकांच्या मदतीला शिवसेना नेहमीच धावून गेली. मुंबईच्या रस्त्या-रस्त्यावर शिवसेनेच्या शाखा दिसतात. कोणाला काही समस्या असली, मदत हवी असली, कोणी त्रास देत असेल तर हीच शिवसेना शाखा या लोकांचा आधार, हक्काचे मदतीचे ठिकाण…शाखेवर गेलात की तुमचे काम झालेच समजा..त्यामुळे अगदी अल्पावधीतच शिवसेनेने सामान्य लोकांच्या मनात घर केले. बाळासाहेब ठाकरे हे सरसेनापती व शिवसैनिक हे नातेही वेगळेच होते.या नात्याच्या धाग्यात एवढी जादू होती की साहेबांसाठी कायपण करायची तयारी शिवसैनिकांची होती. साहेबांचा शब्द म्हणजेच आदेश मानून शिवसैनिक कामाला लागायचा. मुंबई बंद म्हणताच देशाची आर्थिक राजधानी थांबायची, ही ताकद फक्त शिवसेनेतच होती.

भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असावी या भावनेतूनच १९ जून १९६६ साली मुंबईत शिवसेनेची स्थापना करण्यात आली. मुंबईनंतर शिवसेनेने ठाणे, नंतर औरंगाबाद (संभाजीनगर) व त्यानंतर महाराष्ट्रात आपले स्थान भक्कम केले. एकापाठोपाठ एका महापालिकेवर भगवा फडकवत शिवसेनेची घौडदौड सुरुच राहिली. बाळासाहेब ठाकरे यांनी जाती-पातीचे राजकारण कधीच केले नाही. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेनेने हजारो लोकांना राजकारणात आणून महत्वाच्या पदांवर संधी दिली. मनोहर जोशी, छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, लिलाधर डाके, प्रमोद नवलकर, साबीर शेख, चंद्रकांत खैरे, बबनराव घोलप ते गुलाबराव पाटील, अशा सामान्य परिस्थितीतून आलेल्या असंख्य लोकांना शिवसेनेने आमदार, खासदार, मंत्री, महापौर, नगरसेवक केले. बहुजन समाजातील लोकांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेनेने सत्तेची दारे मोकळी करुन दिली. ग्रामीण भागातही शिवसेनेची जादू चालली. बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवून लाखोंच्या संख्येने लोक शिवसेनेत आले. शिवसेना ही सामान्य माणसांना आपली वाटली हीच शिवसेनेची खरी ताकद आणि म्हणूनच ५४ वर्षांनंतरही शिवसेनेची जादू मन-मनात घरू शकली.

राजकारणातही शिवसेनेने प्रस्थापितांना धूळ चारत आगेकुच केली. मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवली नंतर ठाणे, त्यानंतर औरंगाबाद (संभाजीनगर) करत विधानसभेत प्रवेश केला. राष्ट्राचा विचार करत प्रखर हिंदुत्वाची मशाल हाती घेऊन शिवसेनेने दिल्लीच्या तख्तालाही हात घातला. अरे आवाज कुणाचा, शिवसेनेचा ! आला रे आला शिवसेनेचा वाघ आला!! म्हणत शिवसेनेचा हा बुलंद आवाज दिल्लीतही धडकला. शिवसेनेचे वाढते वर्चस्व पाहून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेबरोबर युती केली. ज्या भाजपाला महाराष्ट्रात कोणी विचारतही नव्हते, भटांचा पक्ष म्हणून हिणवले जात होते त्या काळात शिवसेनेने त्यांच्याबरोबर युती करून त्यांना महाष्ट्रात हातपाय पसरण्यास मदत केली. आज भाजपाचे जे काही यश दिसते त्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे ते भाजपाने विसरू नये. १९८९ नंतर विधानसभेवर भगवा फडकवण्याची हाक शिवसेनाप्रमुखांनी दिली आणि १९९४ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले, विधानसभेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला. लोकसभेतही शिवसेनेचा आवाज वाढला आणि वाजपेयी सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री झाले.

बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सुत्रे हाती घेतली व हा वसा त्यांनीही समर्थपणे सुरु ठेवला आहे. आज त्यांच्या रुपाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकत आहे. तर आदित्य ठाकरेंच्या रुपाने पुढचे नेतृत्वही उभे राहिले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार शिवसेनाही बदलली, पण शिवसेना व शिवसैनिक हे नाते मात्र घट्ट राहिले. आजही सामान्य माणसांच्या मनात शिवसेनेला मानाचे स्थान आहे ते त्यांनी केलेल्या कार्यामुळे आणि मराठी माणसाला ताठ मानेने उभे राहण्यास ताकद दिल्यामुळे. आज बाळासाहेबांची शिवसेना ५४ वर्षांची झाली. या शिवसेनेला भविष्यात उत्तम यश मिळो आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान लाभो याच शुभेच्छा!

 

No comments to show.

Leave a Comment