अहमदनगर, दि. 13 ऑक्टोबर:
स्वत:तील साधेपणा जपत परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य आणि ती बदलवण्याचा खंबीरपणा बाळासाहेब विखे-पाटील यांनी दाखविला. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी दिलेला वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला आणि कष्टकरी, शेतकऱ्यांच्या मनात स्वत:चं स्थान निर्मांण केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी मनोगतातून स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे पाटील घराणे हे अनेक अडचणींवर मात करुन पुढे आलेले घराणे आहे. अनेकजण परिस्थितीला शरण जातात. मात्र, विखे पाटील यांनी परिस्थितीला तोंड देत ती बदलवण्याचे सामर्थ्य दाखविले. ‘देह वेचावा कारणी’ हे आत्मचरित्र म्हणजे बाळासाहेबांनी केलेल्या कामाचा, त्यासंदर्भातील आठवणींचा पटच आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांची संस्था ही काचेचं भांडं आहे आणि आपण त्याचे विश्वस्त आहोत, या भावनेतून त्यांनी काम केले. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी घालून दिलेला काटेकोरपणाचा, शिस्तीचा, साधेपणाचा आदर्श त्यांनी कायम ठेवला, असे सांगत विखे पाटील घराण्याविषयी प्रेम, आपुलकी ही पहिल्यापासूनच आहे आणि ती कायम राहील, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे आणि विखे घराण्यातील नात्यालाही उजाळा दिला.
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रास्ताविकात आत्मचरित्र प्रकाशन आणि संस्था नामविस्ताराबाबत माहिती दिली. खासदार. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर आभार डॉ.राजेंद्र विखे पाटील यांनी मानले.
Leave a Comment