विधान परिषद १७ पैकी १७ जागा जिंकणार.
मुंबई, दि. २९ मे २०२६ :
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केला असल्याचे सांगत, “महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास वेगाने पुढे नेत आहोत,” असे शिंदे म्हणाले. एक तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असताना “आमच्या आधी मीडियालाच एवढी घाई का झाली आहे?” असा सवालही त्यांनी केला.
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत विचारले असता, सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे संवेदनशील असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
“मी मुख्यमंत्री असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सोबत मिळून मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय, न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना आणि १० टक्के आरक्षण देण्याचे काम आम्ही केले,” असे सांगत त्यांनी सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले.
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, “देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची भाषा करणाऱ्यांची आज काय अवस्था झाली आहे, हे महाराष्ट्राने पाहिले आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
Leave a Comment