सहा तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी ९९३.७२ कोटी मंजूर.
मुंबई, दि.१९ मे:
राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच भाविक – पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधासह आरोग्यसुविधाची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी शिखर समितीच्या बैठकीत सहा तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली.
सह्याद्री अतिथीगृह येथे विविध तिर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व संबंधित अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कामे करावीत. या विकास आराखड्या अंतर्गत अत्याधुनिक बस स्थानक आणि पार्किंग सुविधा करण्यात यावी. या कामांसाठी जागांचे भूसंपादन वेळेत करावे. या प्रकल्पासाठी सुमारे १७२.२२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मे २०२७ पर्यंत काम पूर्ण करावे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध वळण रस्ते आणि रस्ते रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात यावीत.
सध्या २.७ मीटर रुंदी असलेले रस्ते ७ मीटरपर्यंत रुंद करावा. भक्त आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी मंदिर परिसरात पादचारी मार्ग, कव्हर्ड कॉरिडॉर, फ्लोअरिंग आणि एम्फीथिएटर, २५७ केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नवीन पोलीस स्टेशन आणि विश्रामगृह, भविष्यातील विकास आराखड्यांतर्गत डिंभे धरण परिसरात सबस्टेशन उभारणे, केबल कार (रोपवे) सुविधा सुरू करणे, एमटीडीसीच्या भीमाशंकर रिसॉर्टचा विकास करणे, राजापूर येथे नव्या पर्यटन सुविधांची निर्मिती करण्याचे नियोजन काटेकोरपणे करावे.
संत तुकाराम महाराज यांचे देहू येथील जन्मस्थान, वैकुंठगमन मंदिर परिसर तसेच भंडारा डोंगर परिसराच्या संवर्धन आणि विकासासाठी सर्वंकष आराखडा ४१.७१ कोटींचा आहे. सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यताराचे जतन, संवर्धन आणि परिसर सुशोभीकरणासाठी १३४.८० कोटी रूपयांचा विकास आराखडा आहे. संगम माहुली समाधीस्थळ संवर्धनासाठी १३३ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार आणि लँडस्केप विकास केला जाणार आहे. श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा (वेरुळ)साठी २१० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर’ परिसर मूळ आराखड्यातील पुढील नवीन कामांसाठी सुमारे ३०१.५४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आराखडाही तयार करण्यात आला आहे.
Leave a Comment