Ads

-

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना दिलासा..

By Xtralarge News

May 18, 2026 11:20 am

Ads

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना दिलासा..

ठाणे, दि. १८ मे २०२६ :-

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या TDR च्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेऊन अंतिम निर्णय देईपर्यंत त्यांनी या व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या मालकीच्या या जमिनीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आवाहन करणारा एक vdo त्यांनी समाज माध्यमावर टाकला होता. यानंतर त्यांचे पती दत्तात्रय कडू देशमुख यांनीही पुण्यातील काही प्रसार माध्यमांकडे त्यांची बाजू मांडली होती. २६ वर्षापासून त्यांचा या जमिनीचा वाद कोर्टात सुरू होता. अखेर न्यायालयाने त्यांचा मुलगा हृदयनाथ याचा या जमिनीवरील दावा मान्य केला होता. मात्र तरीही पुण्यातील गोयल गंगा या खाजगी विकासकाने या जमिनीचा TDR आपल्या नावे केल्याने उषा चव्हाण यांनी शिंदे यांच्याकडे आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.

उषा चव्हाण आपली मागणी घेऊन मुलासह ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात आल्या. तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना त्यांनी आपल्या येण्याचे कारण सांगितले. त्यांनी तत्काळ अभिनेते निर्माते मंगेश देसाई यांना याबाबत अवगत केले. त्यांनी उषा चव्हाण यांचे म्हणणे सविस्तर समजून घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती दिली. यानंतर शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून, पुणे महानगरपालिकेने केलेल्या  व्यवहाराला तात्पुरती स्थगिती द्यावी. तसेच दोन्ही पक्ष आणि विकासक तसेच पुणे मनपा यांची स्वतंत्र सुनावणी आपल्यासमोर घेण्यात यावी. यावेळी सर्व पक्षांनी आपापले म्हणणे आणि कागदपत्र सादर करावीत. सर्व बाबी तपासून त्यानंतरच या व्यवहाराला मान्यता देण्यात येईल असे स्पष्ट केले.

यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश देसाई यांच्या फोनवरून उषा चव्हाण यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण या व्यवहाराला तात्पुरती स्थगिती दिलेली असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही असे स्पष्ट केले. पुढील सुनावणी वेळी आपणही आपली सर्व कागदपत्रे सादर करावी त्यावेळी कागदपत्रांची तपासणी करून अंतिम निर्णय घेऊ असे सांगून त्यांना आश्वस्त केले. यावेळी उषा चव्हाण यांनीही आपल्या प्रश्नाची तत्काळ दखल घेऊन दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंगेश देसाई यांचे आभार मानले.

आनंद दिघे यांचे काम आपल्याला माहित होते, त्यांचा वारसा आपण आणि आपले सहकारी चालवत आहात याची मला पूर्ण कल्पना आहे. आज त्यांच्याच आश्रमात आल्यावर तत्काळ दखल घेऊन दिलासा दिलात त्याबद्दल धन्यवाद दिले तसेच आपण या विषयात लक्ष घातल्याने आता या प्रकरणाला वेग येईल आणि मला आणि माझ्या मुलाला नक्की न्याय मिळेल असा विश्वास उषा ताईंनी यावेळी व्यक्त केला.

No comments to show.

Leave a Comment