‘वर्षा’वर निघालेल्या मोर्चावर पोलिसांची दडपशाही ..
मुंबई, दि. १६ मे २०२६..
कोकणातील काजू, आंबा उत्पादक शेतक-यांच्या मागण्यासाठी काढण्यात आलेला मोर्चा पोलिसानी जबरदस्तीने अडवला. मुख्य मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर राजू शेट्टी, शिवसेना, काँग्रेस, माकप पक्षांनी मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला होता. मोर्चा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी या नेत्यांची धरपकड केली. मंत्रालयासमोरील शिवालय बंगल्यावर बैठक सुरू असताना पोलिसांनी बंगल्याला घेरले. बंगल्यातून नेते बाहेर येताच त्यांना जबरदस्तीने पोलीस गाड्यात ढकलण्यात आले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, विनायक राऊत यांना पोलिसांनी फरफटत नेले. इतर नेत्यांचीही धरपकड केली.
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मागील तीन महिन्यापासून या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा निघाला असताना पोलिसांच्या मतदीने शेतकरी विरोधी भाजपा सरकारने अडवणूक केली पण सरकारच्या या दडपशाहीला आम्ही भिक घालत नाही, कोकणातील शेतकऱ्यांच्या पदरात भरीव मदत पडे पर्यंत हा लढा थांबणार नाही अशा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी यासाठी गिरगाव चौपाटीपासून वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्यात येणार होता त्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, शिवसेना नेते विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, मराठी भाषा समितीचे दीपक पवार, प्रकाश रेड्डी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी दडशाही करून मंत्रालय परिसरातील शिवसेनेचे कार्यालय शिवालय येथून ताब्यात घेतले. काही जणांना डोंगरी पोलीस स्टेशन आणि काही जणांना आझाद मैदानात घेऊन गेले.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने आधीच जाहीर पाठिंबा दिलेला आहे. भाजपा महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अन्यथा १५ मे रोजी मोर्चा काढू असा इशाराही दिला होता पण भाजपा महायुती सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने कोकणातील शेतकऱ्यांसाठी आजच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सरकार शेतकरी, कामगार, विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठीच मोर्चे व आंदोलनांना परवानगी देत नाही. शेतकऱ्यांसाठीचा हा मोर्चा लोकशाही मार्गाने काढण्यात येत होता पण सरकार मात्र लोकशाही मुल्य पायदळी तुडवत आहे. जब जब सरकार डरती है, पुलिस को आगे करती है, असे म्हणून सरकारने आंबा उत्पादक शेतक-यांना हेक्टरी ५ लाख रुपये व काजू उत्पादक शेतक-यांना हेक्टरी ३ लाख रुपये मदत द्यावी अशी आमची मागणी आहे ती पूर्ण होईपर्यंत शेतकरी संघर्ष करत राहतील.
Leave a Comment