कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा..
रायगड, दि. ११ मे –
कोकण म्हणजे साक्षात देवभूमी असून इथल्या लोकांनी ती कष्टाने तयार केली आहे. कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कोकणविषयी कौतुकास्पद उद्गार काढले.
रोहा – अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीत उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजने झाली त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत सुनेत्रा अजित पवार बोलत होत्या.
दादा नेहमी कोकणाची बाजू घेत असत. दादांना इथल्या लोकांविषयी अपार जिव्हाळा होता. मी हे का सांगतेय, कारण मी त्यांची सहचारिणी असल्याने त्याबाबत माहिती आहे. दादांना इथली लोकं खूप आवडायची अशी आठवणही सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितली.
विकास म्हणजे निव्वळ सिमेंटचे रस्ते नाही तर लोकांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणि त्यातून त्यांना सुख कसे मिळेल हा खरा प्रयत्न आमचा असणार आहे. अदिती ही माझी मुलगी म्हणून तिच्या मतदारसंघाकडे लक्ष देणार आहे असे सांगतानाच दादांचे प्रेम कोकणावर होते तसेच माझेही कोकणावर प्रेम राहिल असा शब्द सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिला.
आजपर्यंत आम्ही दादांशिवाय कधी कार्यक्रम केला नाही असे तटकरेसाहेब यांनी सांगितले होते दादांनी जी सुरू केलेली परंपरा आहे ती कायम सुरू ठेवेन असा शब्द दिला आणि या कार्यक्रमाला आले असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
रोहा शहराच्या भविष्याला सुरुवात करणारा असा क्षण असल्याचे सांगतानाच आज सर्व कामांचे भूमिपूजन झाल्याचे सुनेत्रा अजित पवार यांनी जाहीर केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, सभापती विजया बाशिलकर, महाड येथील पक्षाच्या नेत्या स्नेहल जगताप, रोहा – अष्टमी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Leave a Comment