राज्यपालांच्या भूमिकेमुळे विजय थलपती अडचणीत !
चेन्नई, दि. ७ मे २०२६..
तामिळनाडू थलापती विजय यांच्या पक्षाने सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय मिळवला असला तरी बहुमतासाठी लागणारा ११८ चा आकडा त्यांच्याकडे नसल्याने सरकार स्थापन करण्यात अडचण येत आहे. राज्यपालांची त्यांनी भेट घेऊन सरकार स्थापन्याचा दावा केला आहे परंतु राज्यपालच विजय यांच्या सरकार बनवण्यात खोडा घालत आहेत.
विजय यांच्या अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘TVK’ या पक्षाने विधानसभा निवडणुकीत १०८ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, मुख्यमंत्री म्हणून त्यांचे स्थान अद्यापही अनिश्चितच आहे. २३३ जागांच्या राज्याच्या विधानसभेत बहुमताचा आकडा ११८ इतका आहे. बुधवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर, गुरुवारी पुन्हा एकदा विजय यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली; परंतु त्यांना निराश होऊनच परतावे लागले आहे. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना ११८ चा आकडा सादर करण्यास सांगितले आहे, ज्यानंतर विजय यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे.
काँग्रेसने त्यांच्या ५ आमदारांचा पाठिंबा विजय थलपती यांना जाहीर केला आहे. तरिही त्यांना अजून काही आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता. तांत्रिक कारणे पुढे करून राज्यपाल विजय यांचा मार्ग रोखत असल्याची चर्चा आहे. पण विजय यांना शपथविधी देऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगावे असे सर्व स्तरातून सांगितले जात आहे. राज्यपालांची भूमिका पाहता विजय यांचा मार्ग सोपा नाही असेच दिसत आहे.
Leave a Comment