Ads

--

महिला सुरक्षा जमत नसेल तर खूर्ची सोडा.

By Xtralarge News

May 4, 2026 4:13 pm

Ads

महिला सुरक्षा जमत नसेल तर खूर्ची सोडा..

मुंबई, दि. ४ मे …

पुण्यातील ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तीची हत्या करण्यात आल्याची घटना संताप आणणारी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अशा नराधमांना फाशीच दिली पाहिजे. राज्यात कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे सांगण्यास ही घटना पुरेशी आहे. दररोज महिला अत्याचाराच्या घटना होत आहेत पण प्रत्येक घटनेनंतर कडक कारवाई करू व विरोधकांनी राजकारण करू नये हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालुपद असते. वास्तविक पाहता सरकारचा पोलिसांवर व पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकच राहिलेला नाही, पोलीस गृहमंत्र्यानाही जुमानत नाहीत हे चित्र आहे, असा घणाघाती हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

खासदार वर्षा गायकवाड सरकारवर तोफ डागत पुढे म्हणाल्या की, पुणे जिल्ह्यातील घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. चार वर्षांच्या लहान चिमुरडीचे खेळण्याचे, हसण्याबागडण्याचे दिवस असतात, अशा निरागस चिमुरडीवर अत्याचार करणारा हैवानच असू शकतो आणि दुर्दैवाने अशा घटना महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात होत आहेत, हे सरकारचे मोठे अपयश आहे. गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी पीडित मुलींचे कुटुंब व हजारो लोक रस्त्यावर उतरले असता फडणवीसांच्या पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, हे त्याहून निंदनीय आहे. लाठीचार्ज करून, तसे काही घडलेच नाही असे पुण्याचे पोलीस आयुक्त माध्यमांना सांगतात हा निर्ढावलेपणा राजकीय आशिर्वादाशिवाय येऊ शकत नाही. पुणे शहरात ड्रग्जचा काळाबाजार, अवैध धंदे, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे पण कारवाई मात्र काहीच होताना दिसत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला लाभलेले आतापर्यंतचे सर्वात निष्क्रीय, कुचकामी व अपयशी गृहमंत्री तथा मुख्यमंत्री आहेत.

खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, भाजप सरकार महिला सुरक्षेवर गंभीर नाही. महिला आणि मुलांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि ॲसिड हल्ल्याच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि जलदगतीने शिक्षा देण्यासाठी महाराष्ट्राने कठोर असा शक्ती कायदा मंजूर केला पण तीन वर्षापासून हा कायदा अंतिम मंजुरीसाठी केंद्रातील भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारकडे पडून आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता तरी भाजपा सरकारने जागे व्हावे व हा कायदा विशेष अधिवेशन बोलावून लागू करावा, अशी मागणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

बदलापुरमध्ये शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. अशोक खरात प्रकरणात महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यात महिला व लहान मुलींवर अत्याचार होत आहेत, हजारो महिला बेपत्ता होत आहेत. भाजपा सरकारमध्ये महिला सुरक्षित नाहीत हे वारंवार होणाऱ्या घटनांवरून दिसत आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही याचा हा परिणाम आहे पण फडणवीस मात्र खुर्चीला टिकटून बसले आहेत. महिला सुरक्षा करता येत नसेल तर खूर्ची खाली करा, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

No comments to show.

Leave a Comment