शिवरायांची बदनामी करणारा कोण हा दुखःद स्वरुप?
नवी दिल्ली, ३० एप्रिल २०२६ ;
छत्रपती शिवाजी महारांजाच्या इतिहासाची विकृत पद्धतीने मांडणी करण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न भाजपा व रा. स्व. संघाकडून केला जात आहे. धीरेंद्र शास्त्रीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध लावून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची विकृत मांडणी केली व शिवाजी महाराजांचे कर्तृत्व व पराक्रम नाकारण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपा व संघाने खुलासा केलेला नाही व सरकारने कारवाईही केली नाही असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
सपकाळ म्हणतात, धीरेंद्र शास्त्रीनंतर आता आनंद स्वरुप का दुखःद स्वरुप नावाचा आणखी एक कोणी भोंदू शिवाजी महाराजांनी लढाया केल्या नाहीत, छापेमारी केली अशी सडकछाप मांडणी करून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, कर्तृत्व नाकारत आहे.
आतापर्यंत भाजपा व त्यांचे बगलबच्चे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करून चुकीचा इतिहास सांगत आहेत, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रा. स्व. संघाने खुलासा करावा व अशा बेताला बडबड करणाऱ्यांवर सरकारने कठोर शिक्षा करावी.
विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विषयावर चकार शब्द काढत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना शिंदे गप्प का? छत्रपतींची विकृत मांडणी एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेना मान्य आहे का? असा थेट सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
Leave a Comment