कल्याणच्या सॅटीस प्रकल्पाला गती द्या.
कल्याण दि २१ एप्रिल :-
कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी सॅटीस प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच पूर्ण MMR क्षेत्रातील वाहतूक कोंडी कायमची दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कन्सल्टंट नेमण्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याण मध्ये MCHI -क्रेडाईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी आणि होम फायनान्स एक्स्पोचा समारोप सोहळा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना, शिंदे यांनी गेल्या १५ वर्षापासून या कार्यक्रमाला मी नियमितपणे येत असल्याचे सांगितले. गेली १५ वर्षे अविरतपणे आपण या प्रदर्शनाचे आयोजन करत असल्याबद्दल त्यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या. ठाण्याप्रमाणे कल्याण डोंबिवली मध्येही अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात या शहरांचा चेहरा मोहरा पुरता बदलून गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना कालखंडात सर्वच विकासक व्हेंटिलेटरवर गेले होते, कोरोना रुग्णांसारखीच त्यांची परिस्थिती होती. त्यामुळे तेव्हा आम्ही ५० टक्के प्रिमियम माफ करण्याचा निर्णय घेतला, मात्र विकासकांना स्टॅम्प ड्युटी भरून त्यांना ग्राहकांना दिलासा द्यायला सांगितले. आधी विकासक इंच इंच लढवायचे मात्र आता पी लाइन प्रमाण मानून काम करायला दिल्याने घरे बांधणे अधिक सोपे झाले. युनिफॉईड डिसीपीआर तयार करताना आम्ही विकासकाचे मत देखील जाणून घेतले कारण केलेल्या नियमाचा फायदा प्रत्यक्ष वापरकर्त्यांना व्हायला हवा असे आमचे मत असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
बांधकाम क्षेत्रावर इतर 250 छोटे मोठे उद्योग अवलंबून असतात. बांधकाम क्षेत्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत जास्त उद्योग आणि रोजगार मिळवून देणारे क्षेत्र आहे. परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी गृहनिर्माण धोरणात काम करणाऱ्या महिला, डबेवाले, ज्येष्ठ नागरिक, गिरणी कामगार यांना घरे देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
कल्याण डोंबिवली क्षेत्रात कन्स्ट्रक्शन TDR २ होता मात्र तो आता १.३५ झाला आहे. मात्र त्यातून इतर पायाभूत सुविधा प्रकल्प उभे करायला विकासक पुढाकार घेत नाहीत त्यामुळे नगरविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांना फोन करून तो पुन्हा २ करावा असे सांगितले आहे. जेणेकरून इथेही ठाण्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन टीडीआर मधून नाट्यगृह, रस्ते, इतर सुविधा उभ्या राहू शकतील. एमसीएचआय क्रेडाईचा मदतीने रस्ते चौक सुशोभित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मेट्रो ५ अ ची निविदा देखील लवकरच निघणार असून त्याद्वारे ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर तळोजा हा भाग एकमेकाशी मेट्रोद्वारे जोडला जाणार आहे.
शीळ फाटा येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खालून गाडी वरून गाडी आणि त्यावरून मेट्रो असा तीन स्तरीय मार्ग तयार केला जाणार असल्याचे सांगितले. कल्याण रिंग रोड झाल्यास शहरातील ट्रॅफिक बाहेरच्या बाहेर जाणार त्यामुळे मोठा दिलासा मिळेल. आमने येथून वडोदरा जेएनपीटी कडे जाणाऱ्या रस्त्याला शक्य असल्यास कल्याणला कनेक्टिव्हिटी देण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल असे यावेळी जाहीर केले. ठाणे पडघा मार्ग आठपदरी करतोय तिथेही एलिव्हेटेड मार्ग तयार करून वाहतूक कोंडी कायमची कमी करावी असे निर्देश दिल्याचे सांगितले.
Leave a Comment