गाफील राहू नका, विक्रमी विजय मिळवा.
बारामती, ता. ७ एप्रिल :
महाराष्ट्राच्या जडणघडणीत अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा असली तरी कोणताही कार्यकर्ता गाफील राहता कामा नये. निवडणूक लागलीच तर ती झुंजारपणे लढून सर्व रेकॉर्ड मोडीत काढत विक्रमी विजय मिळवायचा आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
सुनेत्रा पवार यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवारांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करताना शिंदे म्हणाले की, ही पोटनिवडणूक आपल्यावर दुर्दैवाने ओढवली आहे. त्यांच्या आकस्मिक दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट् हादरला. बारामतीसह संपूर्ण राज्याच्या विकासात त्यांनी भक्कम पायाभरणी केली. अनेक खात्यांची, विशेषतः अर्थ खात्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत सक्षमपणे पेलली. एक कणखर प्रशासक, धारदार संघटक आणि जनतेचा नेता म्हणून त्यांनी आपली छाप उमटवली.
ते पुढे म्हणाले की, आम्ही अनेक वर्ष खांद्याला खांदा लावून काम केले. मुख्यमंत्री असताना “माझी लाडकी बहीण” योजना राबवताना मोठे आर्थिक आव्हान होते. तरीही देवेंद्र फडणवीस, मी आणि अजितदादांनी ठाम निर्णय घेतला. अजितदादांनी आर्थिक ताळमेळ ढळू न देता ही योजना प्रभावीपणे राबवली. त्यांचा स्वभाव स्पष्ट, कणखर आणि तेवढाच आपुलकीचा होता. त्यामुळे त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी प्रचंड आहे.
सुनेत्राताईंनी या कठीण काळात जबाबदारी खंबीरपणे उचलली आहे. दुःख पचवून त्यांनी कामाचा वेग कमी होऊ दिलेला नाही. सांत्वन करणे सोपे असते, पण दुःख पचवून उभं राहणं कठीण असतं आणि ते त्यांनी करून दाखवलं आहे. पवार कुटुंबावर आलेल्या संकटात आपण सगळे त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहोत. आज देवेंद्र फडणवीस, मी आणि सुनेत्राताई राज्यकारभार अधिक जबाबदारीने पुढे नेत आहोत. योजना सुरू ठेवतानाच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारखे धाडसी निर्णय घेतले जात आहेत.
या भागात अजितदादांनी उभारलेला विकास हा साक्षात उभा आहे आणि त्याची साक्ष सुनेत्राताई देत आहेत. त्यामुळे बारामतीची जनता त्यांच्या पाठीशी भक्कम उभी आहे. अनेक संघटना आणि नागरिकांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. अशा दुःखद प्रसंगी ही परंपरा जपली गेली पाहिजे, असे ठाम आवाहन त्यांनी केले. मात्र कोणीही निष्काळजी राहू नये निवडणूक लागलीच तर मैदानात उतरून पूर्ण ताकदीने लढायचे, असे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, दत्ता भरणे, माजी मंत्री धनंजय मुंडे, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, खासदार पार्थ पवार, जय पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Comment