राज्यात PNG प्रक्रियेला गती
मुंबई, दि.२८ मार्च :
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संकटकाळात महाराष्ट्रात पीएनजी (PNG ) वितरणाला गती देण्यात येत असून खतांच्या उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने मुद्दे मांडले.
सध्याच्या कठीण काळात पश्चिम आशिया खंडातील युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकट काळात देशातील नागरिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
सध्याच्या काळात महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या उपाययोजनांची माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात खतांची पुरेशी उपलब्धता असून त्याचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येत आहे. शेतीशी संबंधित बाबी ‘अॅग्रीस्टॅक’ प्रणालीशी जोडण्याचे काम सुरू असून त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसणार आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सातत्याने बैठका घेतल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगभरात या संकटामुळे मोठा विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. फिलिपाईन्समध्ये राष्ट्रीय आणिबाणी लागू करण्यात आली असून थायलंडमध्ये प्रवासावर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. श्रीलंकेत आठवड्यात दोन सार्वजनिक सुट्ट्या वाढवण्यात आल्या आहेत, तर पाकिस्तानमध्ये शाळा आणि कार्यालये बंद ठेवून ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू करण्यात आले आहे. मात्र भारतात परिस्थिती तुलनेने सामान्य ठेवण्यात यश आले आहे, असे त्यांनी नमूद केले.
इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने उत्पादन शुल्कात (एक्साइज शुल्क) केलेली कपात ही सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा देणारी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
Leave a Comment