एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नाव आल्याने RSS ने मोदींचा राजीनामा घ्यावा:
नागपूर, दि. २३ मार्च २०२६.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृत एपस्टिन फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे, हे अत्यंत गंभीर व लाजीरवाणे आहे. एपस्टिन फाईलमध्ये जगभरात ज्यांची नावे आली त्यांनी राजीनामे दिले आहेत तर काहींना अटकही करण्यात आलेली आहे. पण भारतात मात्र अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे पंतप्रधान झालो, असे मोदी सांगत असतात. रा. स्व. संघ नेहमीच संस्कृती व नैतिकतेचा ढोल बडवत असतो, त्याच नैतिकतेच्या आधारे संघाने नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
एपस्टिन फाईल प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकापासून रा. स्व. संघाच्या कार्यालयावर संयुक्त धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर, वंचितचे नेते हर्षवर्धन पुंडकर, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. साजिद खान पठाण, माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सुरेश भोयर, अतुल कोटेचा यांच्यासह काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोर्चाने धडकी भरलेल्या भाजपा सरकारने पोलिसांना पुढे करून मोर्चाला परवानगी नाकारून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला पण हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी संघ मुख्यालय परिसरात धडकले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, एपस्टिन फाईलमध्ये नरेंद्र मोदी व पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे नाव आल्याने पंतप्रधान अमेरिकेपुढे सरेंडर झाले आहेत. याच दबावाखाली नरेंद्र मोदींनी व्यापार करार करून भारताला गुलाम बनवले आहे. देशातून सिलेंडर आणि संसदेतून नरेंद्र गायब झाले आहेत. इंधन गॅस तुडवड्यावर मोदी काहीच बोलत नाहीत, देश म्हणून एकत्र भूमिका घेताना दिसत नाहीत. एपस्टिन फाईलमध्ये नाव आले तरीही काहीच कारवाई होत नाही गेंड्याचा कातडीचे व बेशरमपणाचे लक्षण आहे. एपस्टिन फाईल प्रकरणी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीची भूमिका एकच असल्याने आम्ही संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मोर्चा काढणे हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांचा पोलिसांवर दबाव आहे. संघ कार्यालयावर मोर्चा काढल्याने भाजपाची देशभरात नाचक्की होईल म्हणून परवानगी नाकारण्यात आली तरी आमचा निर्धार व मागण्या कायम आहेत. असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
Leave a Comment