Ads

--

साताऱ्यावरून शिंदेसेना व भाजपात तुंबळ हाणामारी.

By Xtralarge News

March 23, 2026 5:46 pm

Ads

साताऱ्यावरून शिंदेसेना व भाजपात तुंबळ हाणामारी.

मुंबई दि. २३ मार्च :

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत म्हटले की, “मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे.” या घटनेला त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रकरण ठरविले. सदरची बाब शिंदेंनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली.

विधानसभेत बोलताना शिंदे यांनी सांगितले की, निवडणुकीपूर्वीच शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी त्यांना फोन करून दोन मतदारांवर अचानक गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. या प्रकारामागे निवडणुकीचा निकाल बदलण्याचा प्रयत्न असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर तत्काळ साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याशी संपर्क साधून स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, मतदान पूर्ण होईपर्यंत कोणत्याही मतदाराला अडवू नये. मात्र प्रत्यक्षात दोन मतदारांना ताब्यात घेण्यात आल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या घटनेचा निषेध करताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे मतदारांना मतदानापासून रोखण्याची घटना प्रथमच घडली असून हा प्रकार लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर आघात करणारा आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे सहन केले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले.

No comments to show.

Leave a Comment